चोरट्यांचा धुमाकूळ

0

कणकवली : लॉज तपासणी व इतर कामात व्यग्र असलेल्या पोलिसांना रात्रीची गस्त घालण्यास वेळ न मिळाल्याची संधी साधून चोरट्यांनी कणकवली-शिवाजीनगरमध्ये एकाच रात्री सात ठिकाणी घरफोड्या केल्या. यामध्ये काही बंगले, फ्लॅट आणि घराचा समावेश आहे. सुदैवाने चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. मात्र, एका बंगल्यातून चांदीच्या मूर्ती आणि चांदीचा तांब्या वगैरे काही मुद्देमाल चोरून नेला. मात्र, संबंधित घरमालक कोल्हापूरला असल्याने या चोरीची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. एकाच रात्री या घरफोड्या झाल्याने पोलिस यंत्रणाही चक्रावली आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री 1.30 ते बुधवारी पहाटे 4 या दरम्यान घडली. दरवर्षी पावसाळ्यात घरफोड्यांचे प्रमाण वाढते. मात्र, यावर्षी पोलिसांच्या सतर्कतेमुळे घरफोड्या झाल्या नव्हत्या. मंगळवारी कणकवली पोलिसांनी रात्री सर्व लॉजची तपासणी केली. त्यामुळे नेहमीची रात्रीची गस्त घालता आली नाही. त्याचाच फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी शिवाजी नगर परिसरातील काही बंद फ्लॅट आणि बंगले लक्ष्य केले. सर्वच ठिकाणी दरवाजांचे कडीकोयंडा हत्याराने कापून कपाटातील सामान अस्ताव्यस्त केले. मात्र, घरमालकांनी खबरदारी घेतल्याने आतमध्ये दागिने किंवा पैसे चोरट्यांच्या हाती लागले नाही. घरफोड्या झालेल्यांमध्ये  शिवाजनगरमधील हेमलता राजरत्नम यांचा बंद बंगला चोरट्यांनी फोडला. प्राथमिक माहितीनुसार चांदीच्या मूर्ती आणि चांदीचा तांब्या आदी मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला. त्या मुलाकडे कोल्हापूरला असल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही. निसर्ग अर्पाटमेंटमधील रंजना रावजी सावंत यांचा दुसर्‍या मजल्यावरील फ्लॅट चोरट्यांनी लक्ष्य केला. ते मुंबईला राहतात. तेथेही चोरट्यांच्या हाती काही लागू शकले नाही. तर  शिवाजीनगरमधील वासुदेव पांडुरंग मोंडकर यांच्या घराच्या एका खोलीत दिलीप बिल्डकॉनचे मोहनसिंग भाड्याने राहतात. त्या खोलीचा कडीकोयंडा चोरट्यांनी फोडून घरफोडीचा प्रयत्न केला. परिसरातील मातोश्री अपार्टमेंटमधील शैलेंद्र हरी तांबे यांचा फ्लॅट चोरट्यांनी लक्ष्य केला. तेथेही चोरट्यांची निराशा झाली. मातोश्री अपार्टमेंटमधील विलास भिकाजी पाटील या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या दुसर्‍या खोलीचा कडीकोयंडा तोडत असताना पहाटे 2.15 च्या सुमारास आवाज आल्याने ते जागे झाले. दरवाजासमोरून शेवटच्या पायर्‍या उतरून जाताना त्यांना एक माणूस दिसला. मात्र, तो चाहूल लागताच पळून गेला. याच परिसरातील प्रगती विकास पाटकर यांच्या मंगलोरी घरातही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. तसेच शिवाजीनगरमधील गल्ली नं. 4 येथील बळीराम विश्राम आडेलकर या सेवानिवृत्त शिक्षकांच्या घराच्या पाठीमागील खोलीचा कोयंडा चोरट्यांनी तोडला. मात्र, तो चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला. चोरट्यांनी एकूण सात ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केला. चोरट्यांच्या हाती काही लागले नसले तरी एकाच रात्री झालेली ही घरफोड्यांची घटना गंभीर आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आता अधिक सतर्क राहून चोरट्यांमध्ये धाक निर्माण करावा अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे. बुधवारी सकाळी या घरफोड्यांची माहिती मिळताच कणकवलीचे पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी, पोलिस उपनिरीक्षक श्री. कदम, महिला पोलिस उपनिरीक्षक जयश्री पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पंचनामा केला. याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत कोणाचीही तक्रार दाखल झाली नव्हती. या प्रकरणी अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here