शिवसेनेच्या फोडाफोडीच्या राजकारणाला आठ दिवसांत प्रत्युत्तर

0

मालवण : राष्ट्रवादी पक्ष सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. नवे कार्यकर्ते निर्माण करून राष्ट्रवादीला आपण नव्याने उभे करत आहोत. मालवण नगरपरिषदेत गटातटाचे राजकारण सुरू असून नगरपरिषदेतील राष्ट्रवादी पक्षाच्या दोन नगरसेविकांनी पक्षाला पूर्वसूचना न देता स्वार्थासाठी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्याचे मला वाईट वाटते. शिवसेनेच्या या फोडाफोडीच्या राजकारणाला आम्हीही आठ दिवसात जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत दिला. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अमित सामंत हे प्रथमच मालवण येथे आले होते.  त्यांनी कार्यकर्त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तालुकाध्यक्ष विश्‍वास साठे, अगोस्तीन डिसोझा, विनोद आळवे, बाबू डायस, प्रमोद कांडरकर, सदानंद मालंडकर, किरण रावले, हरिश्‍चंद्र परब, अशोक पराडकर, बाळ कन्याळकर, रमण वाईरकर आदी उपस्थित होते. अमित सामंत म्हणाले,  विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेसची आघाडी होत आहे. मात्र आघाडी न झाल्यास पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील तिन्ही  जागा राष्ट्रवादी लढण्यास तयार आहे. मालवण नगरपरिषदेतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका दर्शना कासवकर व शीला गिरकर यांनी केलेल्या शिवसेना प्रवेशाबाबत सामंत यांना विचारले असता दोन्ही नगरसेवकांनी शिवसेना प्रवेशा बाबत आपणास कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. मात्र आपणास माहिती मिळाली त्यावेळी आपण त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.  तरीही त्यांनी शिवसेना प्रवेश केला. हा प्रवेश शिवसेनेवरील निष्ठेपोटी केला नसून वैयक्‍तिक स्वार्थासाठी केला आहे, असा आरोप सामंत यांनी केला.  शिवसेनेने केलेल्या या फोडाफोडीच्या राजकारणाला आम्हीही येत्या आठ दिवसात जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही सामंत यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here