प्रत्येक गावांत मतदार जागृती अभियान राबवा; वैशाली राजमाने

0

कणकवली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक गाव पातळीवर राजकीय पक्ष किंवा त्याअनुषंगिक बॅनर, फ्लेक्स असतील तर ते तातडीने काढण्यात यावेत. प्रत्येक सभा, रॅली, वाहन प्रचार आदी परवानगीनेच होईल. प्रत्येक गावात मतदार जागृती अभियान राबविण्याच्या सूचना प्रांताधिकारी तथा कणकवली निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिल्या. दरम्यान रविवारी मतदारसंघातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेवून त्यांना आचारसंहीता, निवडणूक खर्च आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तलाठी, ग्रामसेवक, पोलीसपाटील तसेच बीएलओ यांना विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती व मार्गदर्शनासाठी येथील मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात राजमाने बोलत होत्या. यावेळी तहसीलदार आर. जे. पवार, निवडणूक नायब तहसीलदार काका कडुलकर उपस्थित होते. राजमाने म्हणाल्या, ज्या मतदान केंद्रांवर लोकसभेला मतदान झाले, त्याचठिकाणी विधानसभेसाठीही मतदान होणार आहे. मात्र, आता पावसाळा असल्याने मतदान केंद्रांचे छप्पर सुस्थितीत आहे का? काही दुरुस्तीची आवश्यकता असल्यास तातडीने कळवा. प्रत्येक गावात लोकप्रतिनिधी वा महत्वाच्या व्यक्‍तींची नावे मतदारयादीत आहेत का? याची खात्री करण्यात यावी. दिव्यांग मतदारांसाठी शासनाकडून मतदानासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक गावात असे मतदार आहेत का? असल्यास ते कोणत्या प्रकारचे आहेत. त्यांना सुविधांसाठी काय उपाययोजना करण्याची गरज आहे, याबाबतची माहिती तालुकापातळीवर तातडीने देण्यात यावी. तसेच काही केंद्रांवर मोबाईल कनेक्टिव्हीटी मिळत नाही, अशा केंद्रांवर कोणत्या कंपनीची रेंज मिळते, त्याची खात्री करून कळविण्यात यावे. गावपातळीवरील पक्ष वा इतर योजनांचे फलक तातडीने काढण्यात यावेत. कोनशिला झाकून ठेवण्यात यावे.आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात  यावी, असेही राजमाने यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार श्री. पवार यांनी सभा, बैठका, ध्वनीक्षेपक, वाहनप्रचार आदीसाठीच्या परवागींसाठी पद्धती याबाबत माहिती घेण्याचे आवाहन केले. आभार मंडळ अधिकारी संतोष नागावकर यांनी मानले.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here