खेड : ही निवडणूक महाराष्ट्राच्या भवितव्याची आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे खा.डॉ. अमोल कोल्हे यांनी येथे केले. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून खेडमध्ये खांबतळे नजीक आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, आमदार संजय कदम यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेचे शुक्रवारी रात्री खेडमध्ये आगमन झाले. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी यात्रेचे जल्लोषात स्वागत केले. शहरातील तीनबत्तीनाका येथील खांबतळे शेजारील जागेत सायंकाळी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, शेख सुभानअली, चित्रा चव्हाण, अमोल मिटकरी, आ. संजय कदम आदी उपस्थित होते. यावेळी अमोल मिटकरी यांसह अनेक राष्ट्रवादी पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केलं. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, गेल्या पाच वर्षात शिवसेनेने सरकारविरोधात अनेकवेळा टीका केली आहे. रिझर्व्ह बँकेतून राखीव निधीतून पैसे काढण्यात आलेत. तर देशातल्या करोडो निवृत्ती वेतनधारकांच्या हक्काच्या पेन्शन फंडातून देखील पैसे काढण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. पाटील म्हणाले की, महाराष्ट्र पुरात बुडत असताना फडणवीस यात्रेत होते. त्यांनी थोडं आधी अलमट्टी धरणाचे दरवाजे उघडण्यासाठी प्रयत्न केले असते तर कदाचित कोल्हापूर व परिसरात पूरस्थिती निर्माण झाली नसती. परंतु, हे सरकार स्वतःचा कारभार चुकीच्या पद्धतीने करत आहे. सभागृहात अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी केवळ चौकशी समिती नेमली मात्र अहवाल सभागृहात मांडण्याचे धाडस केले नाही. प्रकाश मेहता, सुभाष देसाई यांच्या चौकशा झाल्या आहेत. समृद्धी महामार्गात कोणाकोणाला पैसे गेले आहेत, याची यादी मुख्यमंत्री सभागृहासमोर ठेवायला तयार नाहीत. राज्यात सवर्ण व अनुसूचित जातीमध्ये तेढ वाढल्याचा अहवाल पोलिसांनी निवडणूक आयोगाला दिला आहे, असे ते म्हणाले. खा. सुनील तटकरे व अमोल कोल्हे हे सभेच्या ठिकाणी रात्री 10.30 वाजता पोहोचले. यावेळी खा. तटकरे म्हणाले की, निवडून आल्यापासून महाराष्ट्र घडवायचे काम आम्ही करत आहोत. कोकणवासीयांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य दिले. त्यामुळेच नेत्रावती रेल्वेला खेडमध्ये थांबा मिळाला. आगामी कालावधीत जनशताब्दीसह अन्य गाड्या देखील या स्थानकात थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आजही येथे चांगले काम करणारे आमदार संजय कदम यांच्याविरोधात मंत्री रामदास कदम बोलत आहेत. त्यांनी यापुढे न थांबल्यास मला ते सन 2005 मध्ये किती लाचार होते हे उघड करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. या वेळी खा. अमोल कोल्हे म्हणाले, गेली पाच वर्षे मुख्यमंत्र्यांनी गृह खाते स्वतःकडे ठेवले आहे. राज्यात आज माताभगिनी असुरक्षित आहेत. मुख्यमंत्र्यांनी बेरोजगारी दूर करण्याच्या उद्देशाने महा पोर्टल ज्या कंपनीला बनवण्याचं काम दिलंय ती कंपनी मध्यप्रदेशात व्यापम घोटाळा करून आली आहे.
