दुचाकीसह दाम्पत्य कोसळले नदीत

0

कुडाळ : कुडाळ-घोडगे राज्यमार्गावर भडगांव पुलावर गाडीसमोर अचानक साप आल्याने दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटून मोटारसायकलसह पती-पत्नी नदीत कोसळली. यात मोटारसायकलस्वार हरी रवींद्र जिकमडे (वय 33 रा. अणाव दाभाचीवाडी) हा सुदैवाने बचावला. मात्र, पत्नी सौ. दीप्‍ती जिकमडे (28) ही वाहून गेली. ही दुर्घटना मंगळवारी रात्री 8 वा.च्या सुमारास घडली. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी लग्‍न झालेल्या या दाम्पत्याबाबत घडलेल्या या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्‍त होत आहे. दरम्यान, आपत्ती यंत्रणेसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या सहकार्याने शोधकार्य हाती घेतले. बुधवारी सायंकाळपर्यंत सुमारे 24 तास शोधकार्य सुरूच होते. तरीही बेपत्ता दीप्‍तीचा शोध लागला नव्हता. घटनास्थळावरून तसेच पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हरी रवींद्र जिकमडे व त्याची पत्नी सौ. दीप्‍ती जिकमडे (रा. अणाव-दाभाचीवाडी) हे दोघेही मंगळवारी सायंकाळी जांभवडे-भरणी येथे आपल्या नातेवाइकांकडे मोटारसायकलने गेले होते. सायंकाळी नातेवाइकांकडून हे दाम्पत्य अणावला घरी येण्यास निघाले. सायंकाळी 8 वा.च्या दरम्यान जोरदार पाऊस कोसळत होता. त्यांची मोटारसायकल भडगाव पुलावर आली असता मोटारसायकलसमोर रस्त्यावर साप सरपटताना दिसून आला. या सापाला वाचवण्यासाठी हरी याने मोटारसायकल रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी मोटारसायकल पुलावर असलेल्या दगडी निसाला आदळून जिकमडे दांपत्य मोटारसायकलसह थेट नदीपात्रात कोसळले. यात सौ. दीप्ती मोटारसायकलसह प्रवाहात पडली. तर हरी पुलाच्या कठड्याला अडकून राहिला. पत्नी पाण्यात वाहून जात असल्यानेे त्याने अंधार असूनही तिला पाण्यातून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने तो तिला वाचवू शकला नाही. त्याने भेदरलेल्या अवस्थेत नदीकाठ गाठून रस्त्यावर येत याबाबतची माहिती स्थानिक ग्रामस्थांना दिली. लागलीच याबाबतची माहिती आवळेगांव पोलिस  दूरक्षेत्र व आपत्कालीन कक्षाला देण्यात आली. तत्काळ आपत्कालीन तसेच पोलिस यंत्रणेने घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या सहकार्याने शोध मोहीम हाती घेतली. याबाबतची खबर हरी जिकमडे याने कुडाळ पोलिस ठाण्यात दिली असून याबाबतचा तपास कुडाळ पोलिस करीत आहेत. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here