राजापूर : तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प समर्थकांच्या मागणीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेप्रसंगी राजापुरात या प्रकल्पाबाबत आपण नक्कीच फेरविचार करू व आपणाला पुन्हा चर्चेला बोलावू अशी ग्वाही दिली होती. यामुळे आता पुन्हा एकदा प्रकल्प विरोधकांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध करण्याचा निर्धार केला आहे. रविवारी तारळ येथे नाणार रिफायनरी विरोधी शेतकरी व मच्छीमार संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत हजारो प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित राहून या प्रकल्पाला हद्दपार करण्याचा निर्धार केला. या प्रकल्प विरोधी मेळाव्यात उपस्थित प्रकल्पग्रस्त महिलांनी शिवसेनेचेच काही पदाधिकारी या प्रकल्पाचे समर्थन करत असून त्यांची शिवसेनेने हकालपट्टी करावी अशीही मागणी केली. यावरून शिवसेनेची नाणार प्रकल्पबाबतची भूमिका दुटप्पी असल्याचे पुन्हा एकदा पुढे आले. सौदीचा राजपुत्र आणि प्रकल्पाच्या दलालांसाठी जर शासनाला हा प्रकल्प पुन्हा आमच्या माथी मारायचा असेल तर आम्ही अजिबात गप्प राहणार नाही. रद्द झालेल्या रिफायनरीला आता एक इंच देखील जमीन देणार नाही असा इशारा या सभेत प्रकल्प विरोधकांनी दिला. महाजनादेश यात्रेनिमित्त राजापुरात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत सकारात्मक भुमिका घेताना पुन्हा चर्चा करणार असल्याचे वक्तव्य केले होते. यामुळे प्रकल्प परीसरात तीव्र पडसाद उमटले. प्रकल्पविरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले असून नाणार रिफायनरी विरोधी शेतकरी व मच्छीमार संघटनेच्या वतीने प्रकल्प विरोधकांची रविवारी सभा आयोजित करण्यात आली होती. खासदार विनायक राऊत व आमदार राजन साळवी यांनी या प्रकल्प विरोधी मेळाव्याला हजेरी लावून शिवसेना प्रकल्प विरोधकांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. यावेळी प्रकल्प विरोधी स्थानिक नेते नंदकुमार कुलकर्णी,भाई सामंत ,संजय राणे आदींनी मार्गदर्शन केले. प्रकल्प विरोधी महिला लढ्यातील प्रमुख महिला सोनाली ठुकरुल ,कल्पना मोंडे प्रकल्प विरोधी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
