रत्नागिरी : समुद्राच्या पाण्याला करंट असल्याने मासेमारीसाठी गेलेले अनेक मच्छीमार धोका न पत्करता माघारी परतत आहेत. मासेमारीसाठी टाकलेली जाळी एकमेकाला चिकटून नौकांच्या पंख्यात अडकण्याची शक्यता असते. उरणसह रत्नागिरी जिल्ह्यात तीन नौका बुडून नुकसान झाले आहे. त्यामुळे मच्छीमारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रत्नागिरीतील काही नौका दिघी बंदरात आश्रयाला गेल्या आहेत. हंगामाच्या सुरूवातीपासून मच्छीमारांमागे लागलेले शुक्लकाष्ट संपता संपेना अशी स्थिती आहे. बिघडलेल्या वातावरणाचा पहिला तडाखा मच्छीमारांना बसतो. तीच अवस्था वारंवार पाहायला मिळत आहे. खोल समुद्रात पाण्याला प्रचंड करंट असल्याने नौका स्थिर राहू शकत नाही. मासे मारण्यासाठी जाळी पाण्यात टाकली तर ती पाण्याच्या प्रवाहांबरोबर एकमेकांना चिकटत आहेत. तसेच जाळ्यांच्या लोड मागील बाजूस असल्याने नौकांमध्ये पाणी शिरण्याची सर्वाधिक भीती मच्छीमारांमध्ये आहे. छोटे मच्छीमार किनाऱ्यापासून काही अंतरावर जाऊन मासेमारी करतात. पण त्यांनाही या वातावरणाचा फटका बसला आहे. शनिवारी फिशींगच्या नौकांना बांगडा मिळाला होता. मासेमारीसाठी गेलेल्या दहा पैकी दोन ते तीन नौका ७० ते ८० किलो बांगडा सापडला. किलोचा दरही १७० रुपये मिळाल्याने मच्छीमार समाधानी होते. पर्ससीननेटद्वारे मासेमारी करणाऱ्यांना म्हाकुल, वाशी काही प्रमाणात मिळत आहे. तसेच हर्णत कोळंबी बंपर मिळाली होती. मासळीला मार्केटमध्ये दर चांगला मिळाला. तरीही वातावरणामुळे अनेकांना माघारी परतावे लागले आहे. शनिवारी समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मिनी पर्ससीननेट मच्छीमारी नौका परिस्थिती पाहून रिकाम्या हाती परतल्या होत्या. रविवारी सकाळी काही मच्छीमार समुद्रात गेले होते. पण त्यांना अपेक्षित साथ मिळाली नाही. उरण येथे दोन दिवसांपूर्वी मासेमारीसाठी गेलेली नौका बुडाल्याची घटना पुढे आली आहे. रत्नागिरीत तीन नौका पंख्यात जाळी अडकून बुडाल्या. त्यात एक खलाशी मृत पावला. खोल सुमद्रातील वातावरण बिघडल्यामुळे मच्छीमारही धास्तावलेले आहेत. दोन दिवसात परिस्थिती निवळू लागली असून रविवारी काही नौका मच्छीमारीसाठी बाहेर पडल्या आहेत; परंतु अपेक्षित मासळी मिळालेली नाही असे मच्छीमारांचे म्हणणे आहे.
