रत्नागिरी :शहरातील नवीन नळपाणी योजनेच्या कामातील खोदाईमुळे आणि त्याचठिकाणी टाकून ठेवलेल्या मोठमोठया पाईपमुळे चर्मालय परिसरातील रहिवासी महिलावर्ग आणि लहान मुलांच्या डोळ्यात पाणी येऊ लागले आहे. येथे जलवाहिनी टाकण्यासाठी खोदलेल्या चरांमध्ये आणि पाईपमध्ये अडखळून लहान मुले आणि महिला पडण्याच्या घटना घडत आहेत. चर्मालय येथे रत्नागिरी नगरपरिषद कर्मचारी वसाहत आहे. या ठिकाणच्या घरासमोर नळपाणी योजनेची पाईपलाईन टाकण्यासाठी चर खोदन ठेवण्यात आले आहेत.त्याचबरोबर तेथे मोठ्या वजनाचे पाईपही टाकून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे येथील घरातील महिला वर्गासह लहान मुलांना घराबाहेर पडणे कठिण झाले आहे. एखाद्या कामासाठी बाहेर पडायचे म्हटले तर येथे अडखळून पडण्याची भिती आहे. अशा अनेक घटना घडून महिलांसह लहान मुलांना दुखापती झाल्या आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असून नगर परिषदेने यावर तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
