रत्नागिरी : सिंधुदुर्गप्रमाणेच रत्नागिरी जिल्हा देखील पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्याची मागणी अनेक वर्षापासून होत आहे. यासंबंधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर महाजनादेश यात्रेत रत्नागिरीलाही जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्या अनुषंगाने पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केल्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या कोकण पर्यटन विकास समितीचे (पर्यटन संचालनालय) उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) प्रमोद जठार यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळण्यासाठी रत्नागिरी हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यास तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी या पत्रात जठार यांनी नमूद केली आहे. या पत्रात जठार यांनी म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्हा हा पर्यटनासाठी अत्यंत समृद्ध जिल्हा आहे. गणपतीपुळे, वेळणेश्वर, गुहागर, हर्णे, जयगड यासारखे सुंदर समुद्रकिनारे आहेत. पावस, मार्लेश्वर, राजापूरची गंगा, परशुराम देवस्थान या सारखी अनेक धार्मिक स्थळे आहेत. जयगड, मंडणगड, गोपाळगड, भगवतीगड, यशवंतगड यासारखे अनेक किल्ले आहेत. रत्नागिरी जिल्हा हा लोकमान्य टिळकांची जन्मभूमी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची कर्मभूमी व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव, गोपाळकृष्ण गोखले, महर्षी धोंडो केशव कर्वे, बी. जी. खेर, बाळासाहेब सांवत यांची जन्मभूमी देखील याच जिल्ह्यात आहे. दापोली कोकण कृषी विद्यापीठासह ब्रह्मदेशाच्या राजाचा थिबा याचा थिबा पॅलेस व माचाळ (ता. लांजा) हे थंड हवेचे ठिकाणही आहे. कोकण रेल्वे, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग व पश्चिम महाराष्ट्रातून जोडलेल्या रस्त्यांमुळे पर्यटकांसाठी दळणवळणाची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत. नजीकच्या काळात रत्नागिरी येथील विमानतळ उडान योजनेंतर्गत सुरू होणार आहे. रत्नागिरीचा हापूस आंबा जगप्रसिद्ध असून मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यात येतो. राजापूर बंदर हे ब्रिटीशांची वखार म्हणून ओळखले जात होते. रत्नागिरी. जिल्ह्यातील गावागावात पुरातन काळातील कातळ शिल्पे आढळतात. त्यामुळे रत्नागिरी पर्यटन जिल्हा म्हणून तातडीने मंजुरी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सिंधुदुर्गप्रमाणेच रत्नागिरी जिल्हा देखील पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मुख्यमंत्री जनादेश यात्रेवेळी कोकणात आले असताना त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटन दर्जा मिळायला हवा, असे सुतोवाच केले होते. त्यानंतर जठार यांनी पर्यटन मंत्रालयाला याबाबत पत्रव्यवहार केला आहे.
