मुख्यमंत्री जनतेकडे मागणार ‘महाजनादेश’

0

मुंबई : लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 1ऑगस्टपासून राज्यात महाजनादेश यात्रेला सुरुवात करणार आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून या यात्रेचा प्रारंभ होणार आहे. ही माहिती भाजपचे प्रदेेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली. महिनाभराच्या या यात्रेत ते  राज्याच्या 32 जिल्ह्यांचा प्रवास करून राज्यातील जनतेला पुन्हा एकदा सत्तास्थापन करण्यासाठी कौल मागणार आहेत. या यात्रेचा समारोप 31 ऑगस्ट रोजी नाशिक येथे होणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात महायुतीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याकरिता मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा काढणार आहेत. पाच वर्षांच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने उत्तम कामगिरी केली आहे. राज्यातील जनतेला सुखी आणि आनंदी करण्यासाठी अनेक निर्णय घेतले. त्यामुळे सरकारची कामगिरी घेऊन मुख्यमंत्री जनतेच्या भेटीला जात आहेत. त्याचप्रमाणे या कामगिरीच्या जोरावर ते पुन्हा एकदा जनतेकडे सेवा करण्याची संधी मागतील, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. या यात्रेच्या माध्यमातून ते राज्यातील 32 जिल्ह्यांत 4 हजार 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. एकूण 150 विधानसभा मतदारसंघांतून ही यात्रा जाणार असल्याची माहितीही पाटील यांनी दिली. दोन टप्प्यांत ही यात्रा पार पडणार आहे. पहिला टप्पा एक ते नऊ ऑगस्टदरम्यान, तर दुसरा टप्पा 17 ते 31 ऑगस्टदरम्यान आहे. या यात्रेचे प्रमुख प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर हे आहेत. यात्रेचा प्रारंभ भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत, तर समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत करण्याचा विचार आहे. त्याबाबत त्यांना विनंती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here