राजापूर तालुक्यातील साखरिनाटे परिसरात मुलांना पळवणारी टोळी सक्रिय असल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास याच संशयावरून तेथील रहिवाशांनी एक महिलेला पकडले आहे. सोमवारी ही महिला साखरी नाटे, उर्दू शाळा आणि परिसरात संशयास्पद रित्या फिरताना तिथल्या लोकांना दिसली. त्यामुळे ही महिला मुले पळवणाऱ्या टोळीतील असावी अशा भीतीने लोकांनी तिला पकडले आणि नाटे पोलिसांच्या ताब्यात दिले. ही महिला भिक्षा मागण्याचा निमित्ताने गावात फिरत होती. अशी चर्चा सुरू आहे .तिला पकडल्यानंतर तिने दोन-तीन वेगवेगळ्या ठिकाणचे पत्ते सांगितल्यामुळे लोकांचा संशय बळावला. नाटे पोलीस या महिलेची कसून चौकशी करत आहेत.
मात्र परिसरात या घटनेनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर नाटे सागरी पोलिस ठाण्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा होऊ लागली होती. अद्याप पर्यंत तक्रार दाखल झाली नसली तरीही पोलिस या महिलांचा कसून तपास करीत असून कुणीही या घटनेबाबत अफवा पसरवू नये असे आवाहान पोलिसांनी केले आहे
