चिपळूण : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच शहरातील राजकीय फलक व झेंडे काढण्याचे काम न.प. प्रशासनाने तातडीने हाती घेतले असून न.प.च्या माध्यमातून शहरात राजकीय सफाई केल्याची चर्चा नागरिकांतून सुरू आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली. लगोलग न.प. प्रशासनाने शहरातील सर्व पक्षांचे झेंडे तसेच राजकीय नेत्यांचे शुभेच्छांसहीत कार्यक्रमांचे जाहीरात फलक काढण्याचे काम हाती घेतले. शहरात सुमारे दोन ते अडीचशे जाहीरात फलक तर हजाराहून अधिक झेंडे फडकत होते.आठवडाभरात चिपळुणात जनआशीर्वाद, शिवस्वराज्य, महा जनादेश आदी यात्रांच्या कार्यक्रमानिमित्त जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. विविध राजकीय पक्षांच्या यात्रेनिमित्त जाहीरात फलक व झेंड्यांनी चिपळूण शहर झाकोळून निघाले. चौकाचौकात, खांबाखांबावर कमानीच्या माध्यमातून जागा दिसेल तिथे राजकीय फलक व झेंडे लावण्यात आले होते. मात्र, आचारसंहिता जाहीर झाल्यावर हे सर्व फलक व झेंडे न.प. प्रशासनाने तातडीने काढल्यामुळे झेंडा व फलकाने झाकोळलेला परिसर मोकळा झाला.
