खेड येथे मोबाईल दुकान फोडून लाखो रुपयांचे मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला पकडण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे. १८ नोव्हेंबर रोजी रात्रीचे दरम्यान खेड बाजारपेठ या ठिकाणी असलेल्या ओमसाई मोबाईल शॉपीमध्ये अज्ञात आरोपीत याने चोरी करून शॉपीमधील ५,४६,७०६/- रु. किंमतीचे ४१ मोबाईल हँडसेट चोरून नेलेले होते. त्याबाबत श्री.प्रविण लक्ष्मण पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन खेड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नं. २२६/२०१९ भादवि कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयातील आरोपीत याचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणणेच्या दृष्टीने मा.पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे व मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.विशाल गायकवाड यांनी पोलीस निरीक्षक खेड व पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना मार्गदर्शन करून त्याकामी २ स्वतंत्र तपास पथकांची नियुक्ती केलेली होती. सदर दोन्ही तपास पथकांचे मार्फत अज्ञात आरोपीत यांचा शोध चालू होता.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.शिरीष सासने यांनी अशाच प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहीती काढून सदर तपास पथकाला सुचना देवून मुंबई येथे रवाना केलेले होते. तसेच गोपनीय बातमदार यांचेकडून देखील आरोपीत यांचेबाबत माहीती काढण्यात येत होती. त्याप्रमाणे मिळालेल्या माहीतीच्या आधारे दिनांक २२/०९/२०१९ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकाने अॅन्टॉप हील, मुंबई येथे जावून त्या ठिकाणी संशयित इसम तुषार रामचंद्र गावडे वय २४ मुळ रा.तिसे ता.खेड जि.रत्नागिरी यास ताब्यात घेतले. त्याचेकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने सदर गुन्हयाची कबुली देवून त्याचेकडून गुन्हयात चोरीस गेलेला माल ५,४७,१६३/- रु. किंमतीचे ४१ मोबाईल हँडसेट व अन्य साहीत्य हस्तगत करण्यात आलेले आहे. आरोपीत याचेकडे केलेल्या अधिक चौकशीमध्ये त्याने खेड पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ९४/२०१९ भादवि कलम ४५७,३८० हा गुन्हा केल्याची देखील कबुली दिलेली आहे. नमुद गुन्हयामध्ये आरोपीत याने श्री.गणेश पर्शराम गिल्डा यांचे दुकानातील ३६,०००/- रु. किंमतीचे ३ एल.इ.डी. टी.व्ही.चोरलेले आहेत. नमुद आरोपीत यास पुढील कार्यवाहीकरीता खेड पोलीस स्टेशनकडे सुपुर्द करण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.विशाल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री.शिरीष सासने, पोहेकॉ संजय कांबळे, शांताराम झोरे, राकेश बागुल, नितीन डोमणे, रमीज शेख, दत्ता कांबळे यांनी केलेली आहे.
