मुंबई : राज्यातील दुकाने आणि आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्याचा निर्णय कामगार कल्याण मंत्री डॉ. संजय कुटे यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे ही वाढ सुमारे दुप्पट आहे. याचा फायदा राज्यातील १० लाख दुकाने आणि आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे एक कोटी कामगारांना होणार आहे. कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्याची मागणी गेल्या नऊ वर्षापासून प्रलंबित होती. ती आता पूर्ण होत आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका हद्दीतील सर्व क्षेत्र तसेच महानगरपालिका क्षेत्रापासून २० किलोमीटर पर्यंतचे औद्योगिक क्षेत्र व छावणी क्षेत्र या परिमंडळात काम करणाऱ्या कामगारांना दिलासा मिळाला आहे. याबाबतची अधिसूचना सरकारने जारी केली आहे. महापालिका क्षेत्रातील कुशल कामगारांचे किमान वेतन ५,८०० वरून ११,६३२ रुपये, अर्धकूशल कामगारांचे वेतन ५,४०० वरून १०,८५६ रुपये करण्यात आले आहे. तर नगरपरिषद परिमंडळातील कुशल कामगारांचे किमान वेतन ५,५०० वरून ११,०३६ रुपये, अर्धकूशल कामगारांचे ५,१०० वरून १०,२६० रुपये, अकुशल कामगारांचे ४,७०० वरून ९,४२५ रुपये केले आहे. तसेच राज्यातील अन्य क्षेत्रातील कुशल कामगारांचे किमान वेतन ५,२०० वरून १०,४४० रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे.
