पक्ष सोडणार्‍यांना वेशीपर्यंत पोहोचवू

0

कणकवली : माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांना भाजप प्रवेश पक्षाने दिल्यास पक्षाचा आदेश आपल्याला मान्य असेल, अशी भूमिका सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचे अध्यक्ष, माजी आमदार प्रमोद जठार यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली. त्याच वेळी भाजपचे नेते संदेश पारकर यांच्या राणेंबद्दलच्या वक्‍तव्याचा संदर्भ घेत भाजपमधील पारकरांचे वय किती? असा प्रश्‍न उपस्थित करून जठार यांनी पक्ष सोडायचाच असेल तर पक्ष सोडणार्‍यांना वेशीपर्यंत पोहोचवेन, असा इशाराही अप्रत्यक्षरीत्या संदेश पारकर यांना दिला आहे. जठार यांच्या या वक्‍तव्याने सिंधुदुर्ग जिल्हा भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. ज्यांना भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे त्यांना पक्षाची ध्येयधोरणे मान्यच करावी लागतील. विकासाच्या अजेंड्याला जो समर्थन देईल तो भाजपचा कार्यकर्ता. कुणी पक्षात येऊन आमचा पक्ष हायजॅक करू शकत नाही. जे येतील त्यांना घेऊ आणि आम्हाला हवे तसे घडवू. खा. राणेंच्या प्रवेशाबाबत मुख्यमंत्री आणि प्रदेश कोअर कमिटी जो काही निर्णय घेईल तो भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्याला मान्य असेल. पक्षश्रेष्ठी पक्षहिताचाच निर्णय घेतील. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अस्वस्थ होऊ  नये, असेही मत जठार यांनी व्यक्‍त केले. यावेळी त्यांनी संदेश पारकर यांच्या वक्‍तव्यावर त्यांचे पक्षातील वय काय? असा सवाल करत  त्यांना कानपिचक्या दिल्या. कणकवलीतील भाजप जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा वाहतूक आघाडीचे अध्यक्ष शिशिर परुळेकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र शेटये, अरविंद कुडतरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रमोद जठार म्हणाले, पक्षात कुणाला घ्यावे आणि कुणाला घेऊ नये, याबाबतचा निर्णय हा पक्षश्रेष्ठींचा आहे. पक्षात कोण आले आणि कोण गेले यामुळे पक्षावर काहीच परिणाम होणार नाही. मात्र, एक नक्‍की 2024 मध्ये कोकणात शत-प्रतिशत भाजप होईल याचा विचार करूनच पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. राणे भाजपमध्ये आल्यास सिंधुदुर्गात पक्ष हायजॅक करतील, अशी भीती संदेश पारकर यांनी व्यक्‍त केली होती, याकडे जठार यांचे लक्ष वेधले असता संदेश पारकर यांचे पक्षातील वय किती? असा प्रतिसवाल करत पारकरांची भीती निरर्थक असल्याचे सांगितले. राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत जिल्ह्यातील भाजप पदाधिकार्‍यांमध्ये अनुकुल आणि प्रतिकुल अशी दोन्ही मते आहेत. ती मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आली आहेत. आता पक्षश्रेष्ठी त्यावर योग्य तो विचार करून निर्णय घेणार आहेत. पक्षश्रेष्ठींनी एकदा निर्णय घेतला की तो सर्वांसाठी अंतिम असणार आहे. तो सर्वांना मान्यच करावा लागेल. पक्षश्रेष्ठींचा निर्णय ज्यांना मान्य नसेल ते खुशाल पक्ष सोडून जावू शकतात, आपण त्यांना वेशीवर पोहोचवायला जाईन, असा टोलाही प्रमोद जठार यांनी राणेंच्या प्रवेशावर मते व्यक्‍त करणार्‍या पक्षातील पदाधिकार्‍यांना लगावला. राणेंच्या प्रवेशाबाबत मुख्यमंत्री आणि प्रदेश कोअर कमिटी योग्य तो विचार करून निर्णय घेतील. लवकरच जो काही निर्णय असेल तो अपेक्षित आहे. मात्र, युतीच्या निर्णयावरच राणेंच्या प्रवेशाचा निर्णय अवलंबून असल्याचे संकेतही प्रमोद जठार यांनी दिले. 

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here