1 लाख बेरोजगारांच्या ‘हत्ये’चे पाप राऊतांनी करू नये

0

कणकवली : कोकणातील 1 लाख बेरोजगारांना नाणार रिफायनरी प्रकल्पामुळे रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी सरकार तयार आहे, जमीन मालकही तयार आहेत आणि प्रकल्पही तयार आहे, असे असताना हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी म्हणजे 1 लाख बेरोजगारांची हत्या करण्यासारखी आहे. ते पाप खा.विनायक राऊत यांनी करू नये. शिवसेनेतील रिफायनरी समर्थक पदाधिकार्‍यांच्या हकालपट्टीचे वक्तव्य म्हणजे शिवसेनेतील लोकांचेही या प्रकल्पाला समर्थन आहे. जे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना कळले ते खा.राऊत यांना का नाही? असा सवाल भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केला. नाणार प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होणारच, असा दावाही त्यांनी केला. कणकवलीतील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.प्रमोद जठार म्हणाले, नाणार प्रकल्पाबाबत खा.विनायक राऊत हे शिवसेना नेत्यांची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. नाणार प्रकल्पामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात परप्रांतिय येतील ही खा.राऊत यांची भीती निरर्थक आहे. मुंबईत तर शिवसेनेची एक हाती सत्ता आहे असे असतानाही मुंबईत मोठ्या प्रमाणावर परप्रांतिय कसे? नाणार परिसरात ज्यांनी जमिनी घेतल्या आहेत ते कोणाशी संबंधित आहेत हे खा.राऊत यांना माहीत आहे. जर धनदांडग्यांनी जमिनी घेतल्या असे खा.राऊत यांचे म्हणणे असेल तर सरकारने  अशा जमिनींचे सातबारा रद्द करून जे मूळ मालक आहेत त्यांना चांगले पैसे द्यावेत, ही मागणी आपण सरकारकडे करू शकतो आणि सरकारही याला राजी आहे. या प्रकल्पासाठी नाणार परिसरातील सुमारे 8 हजार हेक्टरवरील जमील मालकांनी आपली संमती पत्रे दिली आहेत. ज्यांना या प्रकल्पासाठी जमिनी द्यायच्या नाहीत त्यांच्या जमिनी या प्रकल्पातून वगळाव्यात, मात्र, प्रकल्प रद्द करणे म्हणजे 1 लाख लोकांचा रोजगार हिरावण्यासारखा आहे. खा.राऊत यांनी बेरोजगारांच्या घरातील चूल पेटविण्यासाठी प्रयत्न करावेत, लोकांची माथी पेटवू नका असा सल्लाही प्रमोद जठार यांनी दिला.  ते म्हणाले, तुम्ही किती वर्षे खासदार झालात त्यापेक्षा तुम्ही या मतदारसंघात किती लोकांना रोजगार दिलात हे महत्त्वाचे आहे. आज कोकणवासीयांना खर्‍या अर्थाने रोजगारांची गरज आहे. कोकणात शिवसेनेला जनतेने आमदार, खासदार, पालकमंत्री सर्वकाही दिले. पण कोकणसाठी तुम्ही काय दिलात? असा सवाल जनता विचारत आहे. त्यामुळेच नाणार प्रकल्प विरोधी भूमिका खा.राऊत यांनी घेवू नये. या प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदुषण होणार नाही याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. खा.विनायक राऊत यांना मिळालेल्या मतांमध्ये भाजपचीही दीड लाख मते आहेत हे त्यांनी विसरू नये आणि मुख्यमंत्र्यांवर टीकाटिपणी करू नये असे जठार म्हणाले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here