समीर नलावडे, संदेश सावंत यांना अखेर जामीन मंजूर

0

कणकवली : वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीवेळी झालेल्या राड्याप्रकरणी दोषी ठरवत जिल्हा न्यायालयाकडून सात वर्षांची कारावासाची शिक्षा झालेले कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे आणि जि.प.चे माजी उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांचे शिक्षेविरूध्द अपिल दाखल करून घेत अपिलाचा निर्णय होईपर्यंत शिक्षेस स्थगिती देत मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दोघांना प्रत्येकी 25 हजाराचा जामिन मंजूर केला. या दोघांच्यावतीने अ‍ॅड. सतीश मानेशिंदे आणि अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी युक्‍तीवाद केला. गेले 19 दिवस कारागृहात असलेल्या नलावडे आणि सावंत यांना जामीन मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच शिक्षेस स्थगिती मिळाल्याने समीर नलावडे यांच्या नगराध्यक्ष पदावरील धोकाही टळला आहे. दरम्यान, दोघांनाही जामीन मंजूर झाल्याचे वृत्त समजताच स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी कणकवलीत फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्‍त केला. 2011 मध्ये वेंगुर्ले नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक कालावधीत 5 डिसेंबर 2011 रोजी रात्री माजी आ. परशुराम उपरकर आणि त्यांचे पोलिस अंगरक्षक मारुती शांताराम साखरे हे वेंगुलेर्र् सुंदर भाटले येथे शिवसेना कार्यालयात बसले होते. त्यावेळी  काँग्रेसचे तत्कालीन कार्यकर्ते समीर नलावडे, संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्यासह एकुण 46 जणांच्या बेकायदेशीर जमावाने हातात लाठ्या काट्या आणि सोड्याच्या बाटल्या घेवून येत उपरकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. तसेच कार्यालयातील साहित्याची आणि कार्यालयाबाहेरील वाहनांची तोडफोड करून नुकसान केले होते, यावेळी उपरकर यांच्या संरक्षणासाठी असलेले पोलिस मारुती साखरे यांनी   श्री. उपरकर यांचा जिव वाचावा यासाठी सरकारी पिस्तुलातून दोन राऊंड फायर केले होते. याबाबत मारुती साखरे यांनी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार वरील 47 जणांवर वेंगुलेर्र् पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी 5 सप्टेंबर रोजी जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकारी वकिलांचा युक्‍तीवाद ग्राह्य मानत समीर नलावडे आणि संदेश उर्फ गोट्या सावंत यांना दोषी ठरवत जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश कदम यांनी 7 वर्ष सश्रम कारावास आणि 31 हजार 500 रुपये दंडाची शिक्षा सुनाविली होती तर अन्य 44 जणांची निर्दोष मुक्‍तता केली होती. या निकालानंतर तात्काळ पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत सावंतवाडी कारागृहात रवानगी केली होती.  दरम्यानच्या कालावधीत त्यांची रवानगी कोल्हापूर येथील कळंबा जेलमध्ये करण्यात आली होती. गेले 19 दिवस ते जेलमध्ये होते. त्यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अपील करण्यात आले होते. सोमवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीअंती अपिलाचा निर्णय होईपर्यंत शिक्षेस स्थगिती देत न्यायालयाने दोघांनाही प्रत्येकी 25 हजाराचा जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे त्या दोघांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here