हरिश्‍चंद्र बिराजदार यांना पदक समर्पित: आवारे

0

मुंबई : जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या कुस्तीगीर राहुल आवारेने 61 किलो वजनीगटात कांस्यपदकाची कमाई केली. राहुलने आपले हे पदक हरिश्‍चंद्र बिराजदार यांना समर्पित केले. आई-वडिलांप्रमाणे प्रशिक्षक काका पवार यांसह अनेकांनी मला पाठिंबा दिला; पण गुरुवर्य हरिश्‍चंद्र बिराजदार यांना मी हे पदक समर्पित करू इच्छितो. राहुल आवारेने थेट कझाकिस्तानवरून दै. ‘पुढारी’शी संवाद साधला. आपल्या कांस्यपदक लढतीबाबत बोलताना राहुल म्हणाला की, उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर कांस्यपदकाच्या या लढतीत माझ्यावर दडपण होते. तो संपूर्ण दिवस मी कोणाशीच बोललो नाही. भारतासोबतच महाराष्ट्राला पदक मिळवून देण्याचा विचार मी करीत होतो. मी जेव्हा सामन्यात उतरलो तेव्हा सर्व दडपण बाजूला सारून मी केवळ प्रतिस्पर्ध्याला कसे पराभूत करायचे याचा विचार केला. त्याने आक्रमक खेळ करीत अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला; पण मी संयमाने खेळत संधीची वाट पाहत होतो. एकदा संधी हुकली दुसर्‍यांदा मी इराणी पद्धतीने त्याला अडचणीत आणले व तो डाव यशस्वी ठरला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये मी सुवर्णपदक जिंकलो. मात्र, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील हे पदक जिंकल्यानंतर मी माझा आनंद व्यक्‍त करू शकलो नाही. देशासह महाराष्ट्राला पदक मिळाले. पदक जिंकल्यानंतर माझा मित्र परिवार स्टेडियममध्ये उपस्थित होता व त्यामुळे आम्ही एकच जल्लोष केला. माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या माणसांमुळेच मला चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळत असते. आता ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचा माझा प्रयत्न असणार असल्याचे राहुल म्हणाला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here