चिपळुणात सेनेसमोर राष्ट्रवादीचे आव्हान

0

चिपळूण : चिपळूण विधानसभा मतदारसंघात यावेळी राष्ट्रवादीने तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे शिवसेनेचे अस्तित्त्व पणाला लागणार आहे. शिवस्वराज्य यात्रेत राष्ट्रवादीने पहिलीच झलक जोरदार दाखवली. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेला संघर्ष करावा लागणार आहे. त्यात सेना, भाजप युतीचे अजूनही पक्के नसल्याने शिवसेनेसमोर आव्हान उभे राहाणार आहे. राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केला आहे. मात्र, सेनेच्या उमेदवाराबाबत अजूनही प्रश्‍नचिन्ह असून या ठिक़ाणी भाजपमधील उमेदवारही इच्छुक आहेत. त्यामुळे चिपळूण-संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघात अजूनही उमेदवारीबाबत चर्चेच गुर्‍हाळ सुरू आहे. 2 लाख 69 हजार 704 मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात 1 लाख 37 हजार 824 स्त्री तर 1 लाख 31 हजार 880 पुरुष मतदार आहेत. महिला मतदारांची संख्या अधिक असल्याने मतदानाच्या दृष्टीने महिला मतदारांकडे अधिक लक्ष केंद्रीत होणार आहे. चिपळूण मतदारसंघाचा विचार केल्यास परशुराम पासून मार्लेश्वरपर्यंत हा मतदारसंघ विस्तारलेला आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या दोन्ही बाजूने मतदारसंघाचा विस्तार झाला असून चिपळूण आणि संगमेश्‍वर या दोन तालुक्यात विभाजन झाले आहे. राजकीय ताकदीच्या दृष्टीने विचार केल्यास संगमेश्‍वर तालुक्यामध्ये शिवसेनेचे प्राबल्य आहे तर चिपळूण तालुक्यात राष्ट्रवादी अधिक मजबूत आहे. मात्र, या निवडणुकीत सलग दोनवेळा आमदारकी भूषविलेले सदानंद चव्हाण यांच्यासमोर हॅट्ट्रीक साधण्याचे आव्हान आहे. गत निवडणुकीत निकम विरुद्ध चव्हाण असा चुरशीचा सामना रंगला. अवघ्या सहा हजार मतांनी चव्हाण विजयी झाले. मात्र, या निवडणुकीत शेखर निकम यांनी चव्हाण यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. त्यात भर म्हणून तिवरे धरणफुटीचा विषय आ. चव्हाण यांना अडचणीत आणणारा ठरणार आहे. शिवाय दोनवेळा प्रतिनिधीत्व करताना विकासाबाबत दाखविण्यासारखे काम नसल्याने मतदारसंघात त्यांच्या कार्यशैलीबाबत तीव्र नाराजी आहे. या नाराजीचा फटका त्यांना बसू शकतो. शिवसेना अंतर्गत असलेली गटबाजी शिवाय संगमेश्‍वर तालुक्यातील कसबा गटातील राजू महाडिक यांनीदेखील शिवसेनेकडे उमेदवारीचा दावा केला आहे. यामुळे निवडणुकीत त्यांना अधिक मेहनत करावी लागणार आहे. दहा वर्षे प्रतिनिधीत्व करताना रस्ते, पाखाड्या व पाणीपुरवठा योजना यांची निकृष्ट झालेली कामे याचा लेखाजोखा मतदारांसमोर ठेवावा लागणार आहे. त्यामुळे यावेळी चव्हाण यांना कडवा संघर्ष करावा लागणार आहे. दुसर्‍या बाजूला शेखर निकम गतवेळी अल्पमतांनी पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावला. कोणतेही पद नसताना त्यांनी जोरदार संपर्क ठेवला आहे व पाणीप्रश्‍नावर लक्ष केंद्रीत केले होते. त्यामुळे यावेळी मतदारांची चव्हाण यांच्याविरोधात नाराजी प्रकट होत आहे. दुसर्‍या बाजूला या मतदारसंघावर भाजपने देखील दावा ठोकला आहे. चिपळूण व देवरूख नगरपंचायत भाजपच्या ताब्यात आहे. या ठिक़ाणी तुषार खेतल यांनी गेली काही वर्षे जोरदार काम सुरू केले आहे. त्याच पद्धतीने चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांचे देखील नाव चर्चेत आहे. चिपळूण मतदारसंघातील नगरपरिषद व नगरपंचायत ताब्यात असल्याने भाजपला चिपळूण मतदारसंघ देखील हवा आहे. गुहागरऐवजी चिपळूण मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आल्यास या ठिकाणी भाजप जोरदार ताकद लावणार आहे. मात्र, अद्याप चिपळूणच्या विरोधी उमेदवारांची घोषणा झाली नसल्याने या मतदारसंघात सेना की भाजपचा उमेदवार असणार याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे.  मात्र, यावेळी राष्ट्रवादीने जोरदार आव्हान उभे केले आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here