आ.भास्कर जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण याची जोरदार शोधमोहीम सुरू

0

शृंगारतळी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा शृंगारतळी येथे आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. मात्र, शिवसेनेत गेलेले माजी आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण याची जोरदार शोधमोहीम सुरू झाली आहे. बेटकर की बेंडल या दोघांच्या नावाबाबत मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे. बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या मतानुसार स्थानिकालाच प्राधान्य देण्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तालुक्यातील आजपर्यंत कोणाच्याही नावावर शिक्‍कामोर्तब झालेले नाही.  शृंगारतळी येथे राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्ताने गुहागर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. पालपेणे फाटा ते चिखली येथील ओंकार मंगल कार्यालयापर्यंत काढलेल्या रॅलीमुळे खुद्द राष्ट्रवादीचे नेतेही आश्चर्यचकित झाले होते. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी हा मेळावा आयोजित करणार्‍या तरूण कार्यकर्त्यांची पाठही थोपटली होती. तालुक्यातील बहुसंख्य लोकांची तालुका बाहेरील उमेदवार नको अशी भूमिका असल्याने नजरेसमोर असणारा हा उमेदवार उमेदवारीसाठी अद्यापही तयार नसल्याचे वृत्त आहे.  या उमेदवाराने नकार दिल्यास बाहेरच्या उमेदवारावर कार्यकर्त्यांना समाधान मानण्याची वेळ येणार आहे. शिवसेनेचे सहदेव बेटकर यांना राष्ट्रवादीने गळ घातली असून त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुनील तटकरे यांची भेटदेखील घेतली आहे. त्यामुळे गुहागर मतदारसंघात राष्ट्रवादीकडून कुणबी समाजातील उमेदवाराची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांच्या नावाची देखील चर्चा असून भास्कर जाधव यांच्याविरोधात बेंडल की बेटकर या बाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here