राष्ट्रभाषेतून कथाकथन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

संगमेश्वर दि. २४ ( प्रतिनिधी ):- राष्ट्रभाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने संपन्न होत असलेल्या हिंदी पंधरवड्या निमित्त संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूलने प्रशालेत राष्ट्रभाषेतून कथाकथन स्पर्धेचे आयोजन केले होते. प्राथमिक स्तरासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

HTML tutorial

          संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये आणि मुख्याध्यापिका नेहा संसारे यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक कालिदास मांगलेकर, हिंदी शिक्षक किशोर नलावडे, सातोसे, राकेश लोध आदि उपस्थित होते. प्रास्ताविक करताना निशा निमले यांनी हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याने या भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा या उद्देशाने कथाकथन स्पर्धा खास हिंदीतून आयोजित केली असल्याचे प्रास्ताविकात स्पष्ट केले.

           मुख्याध्यापिका नेहा संसारे यांनी आपल्या मनोगतात , प्रथमच हिंदीतून कथाकथन स्पर्धा होत असतांना विद्यार्थ्यांचा जो उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला त्यासाठी विद्यार्थी आणि सर्व हिंदी शिक्षक यांचे अभिनंदन केले. यापुढे संस्कृत आणि इंग्रजी या भाषांमधूनही कथाकथन स्पर्धा आयोजित करुन मुलांना अधिक सक्षम बनविण्याचा प्रयत्न केला जाईल असे यावेळी स्पष्ट केले. मुलांनी न अडखळता पहिल्याच प्रयत्नात धाडसाने कथा सांगून उपस्थितांची मन जिंकली याचा अधिक आनंद झाल्याचे संसारे यांनी अखेरीस नमूद केले.

           तुळसणी येथे हिंदी पंधरवड्या निमित्त आयोजित तालुकास्तरीय गीत गायन आणि जाहिरात स्पर्धेत पैसा फंड इंग्लिश स्कूलने प्राथमिक गटात प्रथम , माध्यमिक गटात द्वितीय आणि जाहिरात स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक मिळवत जे उल्लेखनीय यश मिळविले याबद्दल संस्थेच्या वतीने यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था सचिव धनंजय शेट्ये यांनी आपल्या मनोगतात अभिनंदन करुन हिंदीतून कथाकथन स्पर्धा आयोजित केल्याबद्दल हिंदी विभागाचे कौतूक केले. 

               तुळसणी येथे यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी धनंजय शेट्ये आणि नेहा संसारे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हिंदी कथाकथन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विनोद ढोर्लेकर आणि स्वाती शिंदे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा निमले यांनी तर आभारप्रदर्शन सातोसे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here