फासकीत जातोय बिबट्यांचा जीव

0

रत्नागिरी ः रानटी डुकरांमुळे शेतीची नासधूस होते. त्यामुळे या डुकरांच्या शिकारीसाठी शेतात फासकी लावण्यात येते. मात्र, या फासकीत बिबट्या अडकण्याची घटना अनेकवेळा घडत आहे. मागील अकरा वर्षांत एकूण 43 बिबटे फासकीत अडकले असून, यातील 14 बिबट्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. 43 गुन्ह्यांपैकी 9 प्रकरणांमध्ये आरोपींवर खटला दाखल करण्यात आला आहे. परंतु एकाहि खटल्याचा निकाल अद्याप लागलेला नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, संगमेश्‍वर, रत्नागिरी, चिपळूण, मंडणगड या तालुक्यांमध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. याच भागात डुकरांच्या शिकारीसाठी फासकी लावण्याचे प्रमाण अधिक आहे. जंगलात शिकार न मिळाल्याने बिबटे मानवी वस्तीशेजारी भक्ष्याच्या शोधात येतात. त्यावेळी शिकारीसाठी लावलेला फासकीत बिबटे अडकतात. फासकीत बिबट्या अडकल्यानंतर बराचवेळ ते कोणाच्याही निर्दशनात न आल्यास बिबट्यांचा तडफडून मृत्यू झाल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. सन 2009 पासून सुमारे 43 ठिकाणी बिबटे आढळले. सन 2010 मध्ये सर्वाधिक दहा बिबटे फासकीत अडकले होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाला. तर 8 बिबट्यांना वाचविण्यात वन विभागाला यश आले.  गेल्या अकरा वर्षात 43 प्रकरणांमध्ये 14 बिबट्यांचा मृत्यू झाला तर 29 बिबट्यांना फासकीतून सोडवत पुन्हा जंगलात सोडण्यात आले. यामध्ये 9 प्रकरणांमध्ये फासकी लावणार्‍यांपर्यंत पोहोचण्यात वन विभागाला यश आले. तर 7 प्रकरणांचा तपास अद्याप सुरू आहे.  एकाही खटल्याचा निकाल लागला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here