मिलिंद देवरा भाजपच्या वाटेवर?

0

मुंबई : काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ह्यूस्टन येथील ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमातील भाषणांचे ट्विटरच्या माध्यमातून कौतुक केले. मिलिंद देवरा यांच्या या ट्विटला पंतप्रधान मोदींनी उत्तर देत त्यांचे आभार मानले आहेत. मिलिंद देवरांनी केलेल्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यामुळे देवरा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. पंतप्रधान मोदींच्या हाऊडी मोदी कार्यक्रमाबाबत मिलिंद देवरा यांनी काल, सोमवारी एक ट्विट केले होते. ”ह्यूस्टन येथील पंतप्रधान मोदींच्या भाषणातून भारताची सॉफ्ट पावर डिप्लोमेसी प्रतिबिंबित होते. माझे वडील मुरलीभाई यांनी देखील भारत आणि अमेरिका दरम्यानच्या द्विपक्षीय संबंध मजबूत केले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आदारातिथ्य आणि अमेरिकेतील अनिवासी भारतीयांचे योगदान ही गौरवास्पद बाब आहे,” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. त्यांच्या या ट्विटला पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले आहे. मोदी यांनी देवरांचे आभार मानत म्हटले की, मुरलीभाई यांनी पहिल्यांदा दोन्ही देशांदरम्यान संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केला.  मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. देवरा यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी संजय निरुपम यांची उचलबांगडी करून नियुक्ती करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसला स्थैर्य मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर काम करण्यास इच्छुक असल्याचे देवरा यांनी स्पष्ट केले होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here