रत्नागिरी: मिरजोळे येथे सामाईक जागेत विनापरवाना अनधिकृत बांधकाम

0

रत्नागिरी : रत्नागिरीतील मिरजोळे येथे सामाईक जागेत विनापरवाना अनधिकृत बांधकाम करण्यात येत आहे. जागा मालक आणि ग्रामपंचायतीची कोणतीच परवानगी न घेता नियम धाब्यावर बसवून बांधकाम करण्यात येत असल्याने या विरोधात तहसीलदार यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.  मिरजोळे येथे शेंडे कुटुंबाची सामाईक जागा आहे. या जागेची मोजणी झाली असून हद्द निश्चिती अद्यापही झालेली नाही. असे असताना देखील या जागेत घराचे चिरेबंदी बांधकाम सुरू आहे. अन्य हिस्सेदारांना अंधारात ठेऊन होत असलेल्या या बांधकामाबाबत राकेश विठूठल शेंडे यांनी सुरूवातीला ग्रामपंचायत स्तरावर हरकत घेतली. ग्रामपंचायतीने याबाबत संबंधित बांधकाम करणाऱ्याला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत कळवले.  ग्रामपंचायतीची नोटीस मिळाल्यानंतरही संबंधिताने बांधकाम बंद न ठेवता चालूच ठेवले. या प्रकरणी आता शेंडे यांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. मिरजोळे येथील स. नं. १४३, हि. नं. ९१२ या जागेत दुधवडकर नामक व्यक्ती विनापरवाना बांधकाम करत असल्याची तक्रार शेंडे यांनी केली आहे, अनधिकृत बांधकाम तत्काळ थांबवण्याची मागणी या अर्जाद्वारे करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here