नवी दिल्ली : बँकांच्या विलीनीकरणाविरोधात बँक संघटनांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे. वित्त सचिव राजीव कुमार यांनी बँक संघटनांच्या मागण्यांची दखल घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. २६ व २७ सप्टेंबरला हा संप होणार होता. बँक संघटनांच्या सर्व चिंतांवर समिती गठित करण्याच्या मुद्द्यावर वित्त सचिवांनी सकारात्मक भूमिका दर्शविली आहे. ही समिती १० बँकांच्या प्रस्तावित एकत्रिकरणाशी संबंधित मुद्द्यांचा विचार करेल. यात सर्व बँकांची ओळख कायम ठेवण्याचा मुद्दाही आहे. वित्त सचिवांशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर ४८ तासातच संप मागे घेण्याचा निर्णय बॲक संघटनांनी घेतला आहे. त्यामुळे आता २६ व २७ सप्टेंबर रोजी बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
