बंगळुरू : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला मैदानावरील गैरवर्तनाबद्दल ‘वॉर्निंग’ दिली असून, त्याच्या खात्यात एक निगेटिव्ह पॉईंटही जमा झाला आहे. बंगळुरू येथील तिसर्या टी-20 सामन्यात ब्युरेन हेन्ड्रिक्स याला चुकीच्या पद्धतीने धडक मारल्याबद्दल विराटला शिस्तपालन नियमानुसार दोषी ठरवण्यात आले आहे. 2016 पासून नव्या नियमांची अंमलबजावणी झाल्यापासून कोहलीवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची ही तिसरी वेळ आहे. रविवारी झालेल्या सामन्यात विराट कोहली ब्युरेन हेन्ड्रिक्सच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत असताना ब्युरेन त्याच्या वाटेत आडवा आला. यावेळी कोहलीने त्याच्या छातीवर कोपराने धक्का देत त्याला बाजूला केले. कोहलीची ही कृती ‘लेव्हल-1’चा अपराध ठरत असल्याकारणावरून त्याला अधिकृत समज देण्यात आली आहे. शिवाय त्याच्या खात्यात एक निगेटिव्ह गुणही जोडण्यात आला आहे.
