‘दुसर्‍याच्या नोकरीपरि स्वत:ची शेतचाकरी बरी’

0

दापोली : दुसर्‍याची नोकरी नको, काळ्या मातीतच सोनं पिकविन, असा मनाशी ठाम निर्धार करून तालुक्यातील कुंभवे येथील हरिश्चंद्र धोंडू शिगवण यांनी शेतीतून बारमाही पिकाचे विक्रमी उत्पन्न घेतले आहे. हे उत्पन्‍न घेताना ‘दुसर्‍याच्या नोकरीपरि स्वत:ची शेतचाकरी बरी’ हा संदेश प्रगतशिल शेतकरी शिगवण यांनी दिला आहे. शिगवण यांची प्रगत शेतकरी म्हणून दापोली तालुका कृषी विभागाने दखल घेत 2017 साली त्यांची पुरस्कारसाठी शासनाकडे शिफारशी केली होती. याची शासनाने दखल घेतली असून शिगवण यांना शासनाच्या कृषी विभागाचा शेतीनिष्ठ पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे त्यांचे तालुक्यात कौतुक होत आहे. वीस वर्षांपूर्वी हरिश्चंद्र शिगवण यांनी मुंबई सोडून गावची वाट धरली परत नोकरी करायची नाही हे मनाशी ठरवून त्यांनी शेतीत पाऊल टाकले. सुरवातीला पारंपरिक पिके घेत सुरुवात केली. मात्र, या पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड हवी म्हणून त्यांनी दापोली तालुका कृषी विभागाचे मार्गदर्शन घेतले. आज त्यांना मालकीची साडेपाच एकर जमीन कमी पडत आहे. इतक्या प्रमाणत त्यांनी शेतीचा विस्तार वाढविला आहे. पावसाळ्यात काकडी, पडवळ, शिराळी, चिबुड, भेंडी आदी पिके घेत असून पारंपरिक भात, नाचणी पीकदेखील विक्रमी घेत आहेत. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात कलिंगड लागवड करून उत्पन्न घेत आहेत. संपूर्ण कुटुंब शेतीपूरक व्यवसायात असून या शेतीला जोड म्हणून दुग्ध व कुक्कुटपालन व्यवसाय करीत आहेत. शिगवण यांची पत्नी जयश्री, मुलगा अनिल आणि सून मनीषा यांनी या शेती व्यवसायात चांगली जोड दिली आहे. अनिल आणि मनीषा दोघेही उच्चशिक्षित असून त्यांनी या शेती व्यवसायात दोघांनाही झोकून दिले आहे. शिगवण यांना शासनाचा शेती शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर दापोली तालुका कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी सचिन हाके, मंडळ कृषी अधिकारी सुभाष अबगुल, कृषी सहाय्यक उदय बंगाल आदींनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तरुणांनी आधुनिक शेतीची कास धरावी या साठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असून विविध योजना शेतकर्‍यांसाठी राबवति आहेत. यासाठी कृषी विभाग कायम शेतकर्‍यांना सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी प्रतिक्रिया तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here