मोबाईल शॉपी फोडून मोबाईल चोरणाऱ्या चोरटयाला बेड्या

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथील ओमसाई मोबाईल शॉपी फोडून दुकानातील ५ लाख ४६ हजार रूपये किंमतीचे ४१ हॅण्डसेट चोरून नेणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. तुषार रामचंद्र गावडे (२४, खेड) असे चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यातही यश आले आहे. खेड बाजारपेठेतील ओमसाई मोबाईल शॉपी अज्ञात चोरट्याने फोडली होती. चोरट्याने शॉपीमधील ५ लाख ४६ हजार ७०६ रूपये किंमतीचे ४१ मोबाईल हँडसेट चोरून नेले होते. या चोरीबाबत प्रविण लक्ष्मण पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन खेड पोलीस ठाणे येथे भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी पोलीस निरीक्षक खेड व पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना मार्गदर्शन करून यासाठी दोन स्वतंत्र तपास पथकांची नियुक्ती केलेली होती. दोन्ही तपास पथकांमार्फत अज्ञात आरोपी यांचा शोध चालू होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांनी अशाच प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती काढून तपास पथकाला मुंबई येथे रवाना केलेले होते. गोपनीय बातमीदार यांच्याकडून देखील आरोपीबाबत माहिती काढण्यात येत होती. त्याप्रमाणे मिळालेल्या माहितीच्या आधारे रविवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकाने अॅन्टॉप हील, मुंबई येथे जाऊन संशयित तुषार रामचंद्र गावडे (२४ मूळ रा. तिसे खेड) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली असून गुन्ह्यात चोरीस गेलेले ५ लाख ४७ किमतीचे ४१ मोबाईल हँडसेट व अन्य साहित्य हस्तगत करण्यात आलेले आहे. आरोपीकडे केलेल्या अधिक चौकशीमध्ये त्याने खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा केल्याची देखील कबुली दिलेली आहे. खेडमधील गुन्ह्यामध्ये आरोपीने गणेश परशुराम गिल्डा यांचे दुकानातील ३६ हजार रूपये किंमतीचे तीन एलईडी टीव्ही चोरले आहेत. आरोपीला पुढील कार्यवाहीकरीता खेड पोलीस स्टेशनकडे सुपुर्द करण्यात आलेले आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक शिरीष सासने, पो. हे. कॉ संजय कांबळे, शांताराम झोरे, राकेश बागुल, नितीन डोमणे, रमीज शेख, दत्ता कांबळे यांनी केली.LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here