स्मार्ट ग्राम स्पर्धेत विर्डी व बापार्डे या दोन ग्रामपंचायतींनी बाजी मारली

0

सिंधुदुर्गनगरी ः महाराष्ट्र शासनाने ग्रामीण विकासासाठी सुरू केलेल्या स्मार्ट ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरावर दोडामार्ग तालुक्यातील विर्डी व देवगड तालुक्यातील बापार्डे या दोन ग्रामपंचायतींनी बाजी मारली असून, शासनाने या दोन्ही ग्रामपंचायतींना विभागून विजयी घोषित केले आहे. मंगळवारी हा निकाल जाहीर केला असून दोन्ही ग्रामपंचायतींना विभागून प्रत्येकी 20 लाख रुपये बक्षीस मिळणार आहे. जिल्ह्यातील अकरा ग्रामपंचायतींची जिल्हा स्मार्ट ग्रामपंचायत मूल्यमापनसाठी निवड करण्यात आली होती. मूल्यमापनासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी जिल्हास्तरीय पाच अधिकार्‍यांची समिती गठित केली होती. या समितीने तालुका मूल्यमापनानंतर तीन महिन्यांत त्या ग्रामपंचायतीने केलेल्या कामांचे मूल्यमापन केले होते. त्यानंतर सादर अहवाल सादर करण्यात आला होता. केलेल्या मूल्यांकनात सर्वाधिक गुण असलेल्या ग्रामपंचायतीला जिल्हा स्मार्ट ग्राम पंचायत म्हणून जाहीर करण्यात आले. ‘स्मार्टग्राम’ पुरस्कार मूल्यमापनासाठी स्वच्छता व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारिक ऊर्जा, पर्यावरण पारदर्शकता, तंत्रज्ञानाचा वापर करून या विषयाशी संलग्‍न मुद्द्यांचा विचार करून 100 गुण स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी निर्धारित करण्यात आले आहेत. बापर्डे व विर्डी या दोन्ही ग्रामपंचायती 100 पैकी 92 गुण प्राप्त करून जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी संयुक्‍त पात्र ठरल्या आहेत. तालुकास्तरीय मूल्यमापनमधून अकरा ग्रामपंचायती जिल्हा स्मार्ट ग्राम मूल्यमापनासाठी पात्र ठरल्या होत्या. यामध्ये कुडाळ-तुळसुली क. नारूर (94 टक्के), मालवण-बुधवळे-कुडोपी (93 टक्के), देवगड-बापार्डे (92 टक्के), वेंगुर्ले- भोगवे (87  टक्के) व कोचरा (87 टक्के), दोडामार्ग-विर्डी (81.50 टक्के) व कुडासे खुर्द (81.50 टक्के), सावंतवाडी-माजगाव (79 टक्के), व निरवडे (79 टक्के), कणकवली-हरकुळ बु. (73.50 टक्के), वैभववाडी- मांगवली (65 टक्के) या ग्राम पंचायतचा समावेश होता. यातून जिल्हा स्मार्ट ग्रामची निवड करण्यासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता व बांधकाम कार्यकारी अभियंता यांची निवड करण्यात आली होती. या समितीने हे मूल्यमापन केले असून मंगळवारी हा निकाल जाहीर करण्यात आला. जिल्हास्तरावर यश मिळाल्याबद्दल विर्डी व बापार्डे या ग्रामपंचायतींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

HTML tutorial


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here