सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेने बाजी मारली

0

संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेपेक्षा भाजपमध्ये ‘इनकमींग’ जोरात सुरू असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र शिवसेनेने बाजी मारल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेनेमध्ये स्वाभिमान पक्षाकडून प्रवेश करणार्‍या कार्यकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून मंगळवारी मुंबईत ‘मातोश्री’वर स्वाभिमान पक्षातील कुडाळ तालुक्यातील कार्यकर्ते माजी पंचायत समिती सदस्य अना भोगले आणि रांगणातुळसुलीचे सरपंच नागेश आईर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. सावंतवाडी तालुक्यातीलही स्वाभिमान पक्षाचे काही कार्यकर्ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशासंबंधीची चर्चा अद्याप सुरूच असून त्या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा भाजपमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. त्यातूनच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अद्यापही संभ्रमाचे वातावरण दिसते आहे. सोमवारी भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आ. प्रमोद जठार यांनी संदेश पारकर यांच्यावर बोचरी टीका केल्यानंतर पारकर यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. संदेश पारकर यांनी यावर प्रतिक्रिया अद्याप दिली नसली तरी त्यांच्या समर्थकांमध्ये मात्र जठार यांच्या वक्तव्याबाबत नाराजी पसरल्याचे वृत्त आहे. राणे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यास भाजपच्या काही लोकांचा जसा विरोध आहे, तसा त्यांच्या प्रवेशासाठी भाजपमधील अनेकजण पाठिंबा दर्शवत आहेत. यातुनच भाजपमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. त्याचवेळी युती होणार की नाही या मुद्यावरूनही राज्यात जसा युतीमधील तणाव वाढत चालला आहे, तसा त्याचा प्रभाव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणावरही पडत चालला आहे. नाणार प्रकल्प हा कळीचा मुद्दा असला तरी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजप या मित्र पक्षांमधील दरी वाढत चालल्याचे दिसत आहे. प्रमोद जठार आणि भाजपच्या इतर पदाधिकार्‍यांनी शिवसेनेचे नेते खा.विनायक राऊत यांच्यावर टीका सुरू केली आहे. या वादात शिवसेनेचे नेते पालकमंत्री दीपक केसरकर आणि जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी अद्याप उडी घेतली नसली तरी खा.विनायक राऊत यांच्यावरील टीका युतीमधील तणाव वाढविणारी ठरण्याची शक्यता आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही पक्षातील जाहीर वाद दोघांनाही अडचणीचे ठरू शकतात, कारण कार्यकर्त्यांची मने फाटली गेली तर त्याचे नुकसान या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना भोगावे लागेल, अशी भीती युतीमधीलच काही लोक व्यक्त करत आहेत. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत तळकोकणात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भाजपला एकही जागा मिळाली नव्हती. गेल्या पाच वर्षात भाजप-शिवसेनेचे सरकार महाराष्ट्रात असले तरीदेखील सत्ता असुनही भाजपला सिंधुदुर्ग जिल्ह्यात बस्तान बसविता आले नाही. आजही भाजपपेक्षा शिवसेनेने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात आपली पकड कायम ठेवली आहे. राणे यांचा भाजप प्रवेश लांबल्याने स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातूनच आपले राजकीय भवितव्य काय? असा प्रश्‍न स्वाभिमान पक्षातील अनेक कार्यकर्त्यांसमोर आहे. अशा काही कार्यकर्त्यांनी स्वाभिमान पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नेमकी हीच संधी साधत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत स्वाभिमान पक्षात अस्वस्थ असलेल्या आणि संभ्रमात असलेल्या जास्तीतजास्त कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेला यात बर्‍यापैकी यश येत असल्याचे चित्र दिसत आहे. दोन दिवसापूर्वी मालवणचे मंदार केणी, यतिन खोत यांनी काही नगरसेवकांसह स्वाभिमान व राष्ट्रवादी पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मंगळवारी कुडाळ तालुक्यातील अना भोगले आणि नागेश आईर या दोन महत्वाच्या स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी थेट मातोश्रीवर जावून शिवबंधन बांधून घेतले आहे. शिवसेनेने अशा इच्छूक महत्वाच्या कार्यकर्त्यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश न घेता थेट मुंबईत ‘मातोश्री’ बंगल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीतच प्रवेश देण्याचे धोरण अवलंबिले आहे. यावरूनच शिवसेनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या प्रवेशांना खुप मोठे महत्व दिल्याचे स्पष्ट होत आहे. शिवसेनेच्या नेत्यांकडून इनकमींगसाठी जोरदार प्रयत्न सुरू असून अजूनही अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. सावंतवाडीचा एक गट पितृपक्ष संपल्यावर शिवसेनेत प्रवेश करणार असून माणगांव खोर्‍यातही काही पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवर आहेत. शिवसेनेमध्ये प्रवेशाचा हा सिलसिला वेगाने सुरू झाल्यामुळेच शिवसेनेतील प्रवेश करण्यास इच्छूक कार्यकर्त्यांची संख्याही मोठी आहे. या सर्वांना लवकरात लवकर प्रवेश देवून विधानसभा निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेत सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे आ. वैभव नाईक हे स्वत: आपल्या मतदारसंघातील जास्तीतजास्त कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यासाठी प्रयत्न आणि नियोजन करत आहेत. खा.विनायक राऊत आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्याकडूनही जिल्हाभरात शिवसेनेकडे येणार्‍या कार्यकर्त्यांची चाचपणी सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी या दोन पक्षांची आघाडी अद्याप जाहीर झालेली नाही. तरीदेखील आघाडी झाल्यास सावंतवाडी हा मतदारसंघ राष्ट्रवादीला तर कणकवली आणि कुडाळ हे दोन मतदारसंघ काँग्रेसला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून सावंतवाडीतून एम.के. गावडे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसकडून कणकवली आणि कुडाळ मतदारसंघात उमेदवार निश्‍चित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येते. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होणारच असे काही नाही. कदाचित हे दोन्ही पक्ष मागील 2014 सालच्या निवडणुकीप्रमाणेच स्वतंत्रपणे लढू शकतात, अशी माहिती आघाडीच्या सूत्रांकडून मिळत आहे. आघाडी तुटली तर तसेही उमेदवार उभे करण्याची तयारी दोन्ही पक्षांकडून सुरू आहे. असेही सांगितले जात आहे की, आघाडीची चर्चा सुरू असताना सावंतवाडी बरोबरच कणकवली हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडला जावा. या मतदारसंघात अगोदरच कणकवलीचे नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते अबिद नाईक यांचे नाव चर्चेत आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीची बोलणी अंतिम टप्प्यात असली तरी त्यांच्याकडून युती होते की नाही याची वाट पाहण्यात येत आहे. कारण युती झालीच तर भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इच्छूक असलेल्या नेत्यांना युतीमध्ये उमेदवारी मिळताना मुश्किल आहे. अशावेळी विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्यास उत्सूक असलेले अनेकजण राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकतात. हीच परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातही सध्या आहे. शिवसेना आणि भाजपमधून विशेषत: कणकवली मतदारसंघात निवडणूक लढविण्यास अनेकजण इच्छूक आहेत. यातील एखादा इच्छूक उमेदवारी न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतो अशी अपेक्षा आघाडीला आहे. तसे घडले तर अशा इच्छूकाला बळ देवून रिंगणात उतरविण्याची रणनिती आखली जात आहे. 

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here