मुंबई : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कुडाळ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला धक्क्यावर धक्के देणे सुरूच ठेवले आहे. तालुक्यातील वेताळबांबर्डे येथील पं.स.चे माजी सदस्य आनंद भोगले व रांगणा तुळसुलीचे विद्यमान सरपंच नागेश आईर यांनी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश स्वाभिमानला कुडाळ तालुक्यात मोठा धक्का मानला जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग वाढले आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासह काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत आहेत. शिवसेना सचिव खा. विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर व आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांवर प्रेरीत होऊन तसेच त्यांच्या कार्यकतृत्वाकर विश्वास आम्ही शिवसेनेत प्रवेश केल्याचे आनंद भोगले व नागेश आईर यांनी सांगितले. त्यांच्या प्रवेश प्रसंगी खा. विनायक राऊत, जिल्हा प्रमुख संजय पडते, देवेंद्र संजय पडते आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. लवकरच वेताळबांबर्डे विभागातील आणखी काहीजण शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, असे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते म्हणाले.
