मुंबई : राज्यातील शिखर बँक असलेल्या राज्य सहकारी बँकेच्या २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सक्त वसुली संचालनालय अर्थात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 70 सर्वपक्षीय संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोणत्याही बँकेचा संचालक नसतानाही पवारांवर गुन्हा दाखल झाल्याने राष्ट्रवादीकडून उद्रेक झाला आहे. आज (ता.२५) राज्यभर राष्ट्रवादीकडून आंदोलने करण्यात आली. स्वतः शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. पवार म्हणाले, केंद्र सरकारच्या ईडीने राज्य सहकारी बंकेच्या संदर्भात माझ्यावर केस दाखल केली. माझ्या आयुष्यातील पहिला प्रसंग जळगांव ते अमरावती शेतकरी दिंडी काढली तेव्हा माझ्यावर खटला दाखल करण्यात आला. आता दुसऱ्यांदा असा प्रकार माझ्याबाबतीत घडला आहे. या यंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे. मी निवडणूक प्रचारासाठी राज्यभरात फिरणार आहे. त्यामुळे माझे वास्तव्य मुंबई बाहेर राहणार आहे. त्यामुळे मला, जर ईडी ला मला काही ‘प्रेमाचा संदेश ‘ द्यायचा असेल अन मी मुंबई बाहेर असेल तर मी कुठेतरी गायब झालो आहे असा समज होवू नये म्हणून शुक्रवारी २७ सप्टेंबरला दुपारी २ वाजता मी ईडीच्या कार्यालयात जाणार आहे. त्यांना हवी ती माहिती मी देईन. अन्य काही पाहुणचार द्यायचा असेल तर तो पण स्वीकारण्यास तयार आहे. मी शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचाराचा व्यक्ती आहे. त्यामुळे मी सहकार्य करणार आहे. महाराष्ट्र हे छत्रपतींचे राज्य आहे. या राज्यातील लोकांवर छत्रपतींचे जे संस्कार झाले आहेत ते दिल्लीच्या तख्तापुढे झुकण्याचे नाहीत. महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढं झुकणार नाही.
