जलतरण स्पर्धेत भारताला सुवर्णपदक

0

बेंगळुरू : भारतीय जलतरणपटूंनी दहाव्या आशियाई वयोगट जलतरण स्पर्धेत मंगळवारी येथे 100 मीटर फ्री स्टाईल प्रकारात आपला दबदबा कायम राखताना सुवर्णपदकाची कमाई केली. याशिवाय महिलांच्या रिले संघाला मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. याशिवाय बालगटातूनही भारताला एक रौप्यपदक मिळाले. वीरधवल खाडे, श्रीहरी नटराजन, आनंद अनिलकुमार आणि सजन प्रकाश या भारतीय रिले संघातील जलतरणपटूंनी 4 बाय 100 मीटर स्पर्धेत 3:23.72 सेकंदाची वेळ नोेंदवून सुवर्णपदकावर नाव कोरले. इराणच्या संघाने भारतापेक्षा 5 सेकंद कमी म्हणजे 3:28.46 अशी वेळ नोंदवली. उझबेकिस्तानच्या संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यांनी 3:30.59 अशी वेळ दिली. पुरुष रिले शर्यतीत भारताकडून श्रीहरीने सुरुवात केली. त्याने 50.68 सेकंदांत 100 मीटरचा पल्‍ला गाठला. तर, वीरधवलने 50.39 सेकंदांची वेळ नोंदवून शर्यतीची सांगता केली आणि सुवर्णपदकावर कब्जा मिळवून दिला. शर्यत संपल्यानंतर श्रीहरी म्हणाला की, शर्यतीची सुरुवात चांगली करणे महत्त्वाचे होते. म्हणून आमच्या प्रशिक्षकांनी मला याची जबाबदारी दिली होती. मी आमच्या संघातील दुसर्‍या क्रमांकाची वेळ नोंदवली. प्रशिक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो याचे समाधान आहे.  महिलांच्या 4 बाय 100 मीटर रिले स्पर्धेत भारतीय महिलांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या संघातील ऋजुता खाडे (59.83 सेकंद), दिव्या सतिजा (1:01.61), शिवानी कटारिया (59.57) आणि मन्‍ना पटेल (59.75) यांनी एकूण 4:00.76 अशी वेळ नोंदवली. 3 मिनिट 54.29 सेकंदांची वेळ नोंदवणार्‍या थायलंड संघाला सुवर्णपदक मिळाले. हाँगकाँग संघाने कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेत मंगळवारी बालक गटातून 4 बाय 100 मीटर रिले स्पर्धेत वेदांत माधवन, उत्कर्ष पाटील, साहिल लष्कर आणि शोअन गांगुली यांच्या संघाने 3 मिनिट 41.49 अशी वेळ नोंदवून रौप्यपदकाची कमाई केली.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here