नवी दिल्ली : बीसीसीआयच्या बहुप्रतीक्षित निवडणुका हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमुळे एक दिवस उशिरा म्हणजे 23 ऑक्टोबरला होणार आहेत. भारतीय क्रिकेटचे संचालन करणार्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी ही माहिती दिली. दोन्ही राज्यांच्या निवडणुकांसाठी मतदान 21 ऑक्टोबरला होणार आहे. या राज्यातील संघटनांना मत देण्यासाठी कोणतीही असुविधा होऊ नये यासाठी बीसीसीआयने निवडणूक एक दिवस पुढे ढकलली. ‘बीसीसीआयच्या निवडणुका या राज्य निवडणुकांनंतर लगेचच होणार आहेत. त्यामुळे आता 22 ऑक्टोबरऐवजी 23 ऑक्टोबरला निवडणूक होतील,’ असे सीओए प्रमुख राय म्हणाले. बीसीसीआय निवडणुकांच्या विलंबासाठी माझा विरोध असेल; पण राज्य निवडणुकांमुळे त्या पुढे ढकलण्यात येत आहेत त्याची जाणीव मला आहे, असे सीओए सदस्य डायना एडुल्जी म्हणाल्या. ‘सर्वोच्च न्यायालयाच्या 20 सप्टेंबरच्या आदेशनुसार राज्य संघटनांना काही दिवसांची सूट देण्यात येऊ शकते; पण बीसीसीआयच्या निवडणुका या वेळेत होणे गरजेचे आहे, महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका असल्याने आम्ही त्या एक दिवसासाठी पुढे ढकलल्या आहेत,’ असे एडुल्जी यांनी सांगितले. ‘मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीबाबत राय यांनी आनंद व्यक्त केला. मंगळवारी याचिकेवर सुनावणी झाली. बीसीसीआयचे वकील, टीएनसीएचे वकील आणि न्यायमित्र पी. एस. नरसिम्हा हे तिथे उपस्थित होते. या सुनावणीनंतर सर्वजण आनंदी आहेत,’ असे राय म्हणाले.
