मुंबई | सचिन अहिर आले असले तरी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शिवसेनेत येतील, असं वाटत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जोरदार चिमटा काढला आहे. पक्ष फोडणं ही शिवसेनेची भूमिका नाही. मला फोडलेली माणसं नको आहेत. मनानं जिंकलेली माणसं हवी आहेत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. शिवसेनाप्रमुखांचे शिवसैनिक, सर्व सोबत आहेत. शिवसेनेची नव्हे, तर मराठी माणूस आणि हिंदूंची ताकद वाढत आहे. मराठी माणूस आणि हिंदूंकडे कोणीही वाकड्या नजरेनं पाहणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सचिन अहिर यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
