कुस्तीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा द्या; बजरंग पुनिया

0

नवी दिल्‍ली : गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक अजिंक्यपद, ऑलिम्पिक, राष्ट्रकुल यासारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये भारतीय मल्ल चांगली कामगिरी करीत आहेत. कुस्ती हा खर्‍या अर्थाने भारतीय मातीतील खेळ आहे. त्यामुळे या खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा देण्यात यावा, या मागणीला भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याने आपले समर्थन दिले आहे.  नुकत्याच झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही भारतीय मल्लांनी सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली होती. या पार्श्‍वभूमीवर पदकविजेत्या खेळाडूंचा केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलत असताना बजरंगने ही मागणी केली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांनी कुस्तीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा देण्याची मागणी केली. या मागणीला आपले समर्थन देताना बजरंग म्हणाला, ‘माझ्या मते कुस्तीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळायला हवा. गेल्या काही वर्षांमध्ये महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये कुस्ती भारताला हक्‍काची पदके मिळवून देत आहे.’ दोनवेळा ऑलिम्पिक पदक पटकावणार्‍या सुशीलकुमारनेही या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी मात्र आपल्याला सर्वच खेळांना समान न्याय द्यावा लागणार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, क्रीडामंत्री या नात्याने मला भारतामधील सर्व खेळांविषयी आस्था आहे. सर्व खेळ आणि खेळाडू माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. मात्र, मला एकतर्फी होऊन चालणार नाही. कुस्ती हा भारतासाठी महत्त्वाचा खेळ आहे. ऑलिम्पिकमध्ये कुस्तीने भारताला नेहमी पदक मिळवून दिले आहे. मात्र, मला ऑलिम्पिक खेळांसोबत इतर पारंपरिक खेळांना समान न्याय द्यायचा आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here