कोकण रेल्वे मधील प्लास्टिक मिश्रित वड्याने दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली

0

खेड : रेल्वे प्रवाशांच्या वारंवार तक्रारी येऊनही कोकण रेल्वेमधील खानपान सेवा अद्यापही सुधारल्याचे दिसत नाही. रेल्वेमधील अधिकृत विक्रेत्याकडून घेण्यात आलेला डाल वडा खाल्ल्याने एका दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडल्याची घटना १५ जुलै रोजी घडली. याबाबत प्रवाशाने रेल्वे प्रशासनाला कळवूनही आजतागायत या ठेकेदारावर कोणतीच कारवाई झाली नसल्याचे दिसून येत आहे

१५ जुलै रोजी रत्नागिरी पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे सचिन किसन शिंदे हे आपल्या पत्नी व दोन वर्षाच्या मुलासोबत मत्स्यगंधा एक्स्प्रेसने रत्नागिरीला येत असताना हि घटना घडली. लहान मुलाने हट्ट केला म्हणून खेड स्टेशन येताच त्यांनी रेल्वेतील विक्रेत्याकडून २५ रुपयांना डाल वडा घेतला. हा वडा खात असताना या लहान मुलाला जोरात ठसका लागला व त्याच्या घशात प्लास्टिक अडकल्याचे आढळले. अधिक पाहता उरलेल्या अर्ध्या वाड्यात देखील प्लास्टिकचे तुकडे होते. हि बाब त्यांनी तत्काळ खेड स्थानकात उतरून या विक्रेत्याला दाखवली. मात्र हे प्लास्टिक नसून लसूण असल्याचा कांगावा या विक्रेत्याने सुरुवातीला केला मात्र जमलेल्या प्रवाशांनी सुनावल्यावर तो भानावर आला. यानंतर या रेल्वेत खानपान विक्रीचा   ठेका घेणाऱ्याला बोलावल्यावर त्याने तुम्हाला काय करायचे ते करून घ्या असे उर्मटपणे उत्तर दिले. सचिन शिंदे रत्नागिरीत येताच त्यांच्या मुलाला त्रास सुरु झाला, त्यांनी आपल्या मुलाला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले. तीन दिवस उपचार घेतल्यावर आता या मुलाची प्रकृती सुधारली आहे. या मुलाच्या उलटी मधूनही प्लास्टिक तुकडे पडल्याचे दिसून आले आहे. सचिन शिंदे यांनी याबात रेल्वे प्रशासानाकडे तक्रार नोंदवूनही याबाबत विक्रेत्यावर कारवाई झालेली नाही.

ठेकेदाराचा भाऊ कोकण रेल्वेत मोठ्या पदावर ?

रेल्वेमध्ये ज्या विक्रेत्याकडून हा डाल वडा घेण्यात आला त्या ठेकेदाराचा भाऊ कोकण रेल्वेमध्ये मध्ये मोठ्या पदावर कार्यरत होता अशी माहिती मिळत आहे. याच भावाच्या जीवावर या ठेकेदाराने वड्यामध्ये प्लास्टिक आढळूनही तुम्हाला काय करायचे ते करून घ्या असे बेधडक उत्तर दिले आहे असे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here