नवी दिल्ली : तेलुगू इंडस्ट्रीचे प्रसिध्द कॉमेडियन वेणु माधव यांचे वयाच्या ३९ व्या वर्षी निधन झाले. वेणु यांनी बुधवारी, १२ वाजून २० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. वेणु किडनीशी संबंधित आजाराने दीर्घकाळ त्रस्त होते. याआधी त्यांना २२ सप्टेंबरला रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. मंळवारी, पुन्हा त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंत, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. यानंतर, त्यांना क्रिटिकल केअर युनिटमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. कॉमेडियन वेणु माधव यांच्या निधनाचे वृत्त तेलुगू चित्रपट पीआरओ वामसी काकाने आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहे. वेणु यांच्याविषयी त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे-‘अभिनेते वेणु माधव आता राहिले नाहीत. १२.२० मिनिटांवर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे कुटुंबीय आणि डॉक्टर्सनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अभिनेते वेणु माधव यांच्या आत्म्यास शांती मिळो.’ आंध्र प्रदेशच्या नालागोंडा जिल्ह्यामधील कोडड गावात वेणु यांचा जन्म झाला. १९९७ मध्ये ‘संप्रदायम’ आणि ‘मास्टर’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘हंगामा,’ ‘भूकैलास’ आणि ‘प्रेमाभिशेकम’मध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या. वेणु यांनी आतापर्यंत १५० हून अधिक तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये काम केले आहे.
