कणकवली ः विधानसभा निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांनी स्वतंत्र खाते खोलण्यास अर्ज दाखल केल्यानंतर तातडीने खाते खोलून द्यावे़ त्या खात्यांवरून होत असलेला व्यवहार दहा लाखांपेक्षा जास्त असेल तर त्याची माहिती तत्काळ निवडणूक नियंत्रण कक्षाकडे द्यावी. ज्या प्रिंटिंग प्रेस युनिट धारकांकडे उमेदवारांच्या जाहिरात साहित्याचे प्रिंटींग होत असेल त्यांनी साहित्याची आकडेवारी, होणारे बिल यांची माहिती निवडणूक विभागाला कळवावी, असे आवाहन कणकवली विधानसभा क्षेत्राच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी केले़. कणकवली निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आयोजित बँक अधिकारी व प्रिंटींग प्रेस धारकांच्या बैठकीत प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी मार्गदर्शन केले. कणकवली तहसीलदार आर. जे. पवार, वैभववाडी तहसीलदार रामदास झळके व विविध खात्याचे अधिकारी, बँक प्रतिनिधी, प्रिंटींग प्रेसधारक उपस्थित होते़ वैशाली राजमाने म्हणाल्या, कणकवली विधानसभा क्षेत्रात जे-जे उमेदवार राष्ट्रीयकृत बँकामध्ये निवडणूक खाते खोलण्यासाठी येतील त्यांना तातडीने सेवा द्यावी़ आचारसंहितेचा भंग होणार याची काळजी घेण्यासाठी बँकेतून होणारे व्यवहार जे दहा लाखांपेक्षा जास्त असतील, त्याची नोंद झाली पाहिजे़ त्याबाबत माहिती आमच्या नियंत्रण कक्षाशी बँक अधिकार्यांनी द्यावी़. निवडणूक काळातील प्रसिध्दी प्रचारासाठी प्रिंटींग प्रेस युनिट धारकांसाठी राजकीय पक्षांकडून कामे येतील़ त्याबाबत सतर्कता ठेवली पाहिजे़ जेवढ्या प्रती प्रिंटिंग होतात त्याची माहिती कळवावी जेणेकरून विरोधी उमेदवारांकडून तक्रारी झाल्यास आपल्याकडे डाटा असेल, असे वैशाली राजमाने यांनी सांगितले़.
