युती न झाल्यास जिल्ह्यात राजकीय संघर्ष अटळ

0

रत्नागिरी : जिल्ह्यात शिवसेना भक्कम असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून जोरदार संघर्ष होऊ शकतो. शिवसेना-भाजप युती होणार, असे चित्र उभे केले जात असले तरी अद्याप युतीबाबतच्या निर्णयाची स्पष्टता न झाल्याने स्थानिक नेत्यांमध्ये घालमेल सुरू आहे. जिल्ह्याची समीकरणे युतीवरच अवलंबून असून युती न झाल्यास जिल्ह्यात राजकीय संघर्ष अटळ आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांच्या सर्व सभांमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. जिल्ह्यात भाजपची ताकद शिवसेनेच्या तुलनेत कमी आहे; मात्र असे असतानाही रत्नागिरी येथे झालेल्या जनादेश यात्रेदरम्यानच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला चार तास उशीर होऊनही मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यावरून भाजपनेही जिल्ह्यात आपली ताकद निर्माण केल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. केंद्र व राज्य सरकारबाबत जिल्ह्यात सकारात्मक वातावरण आहे. यामुळे जिल्ह्यात युती झाल्यास पाचही विधानसभा मतदारसंघात युतीला भरघोस मतदान होऊ शकते. असे असले, तरी जिल्ह्यात राष्ट्रवादीनेही आपली ताकद उभी केली आहे. गत निवडणुकीत दापोली – मंडणगड – खेड व गुहागर विधानसभा मतदारसंघ या दोन ठिकाणी राष्ट्रवादीला यश मिळाले होते. चिपळूण – संगमेश्वर, रत्नागिरी व राजापूर-लांजा-साखरपा या तीन विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेने आपले शिक्कामोर्तब केले. गत निवडणुकीच्या स्थितीमध्ये आता बदल झाले आहेत. गुहागर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार व माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने उत्तर रत्नागिरीमध्ये शिवसेनेला बळकटी मिळाली आहे. पर्यावरणमंत्री व शिवसेनेचे नेते रामदास कदम हे आपले चिरंजीव योगेश कदम यांच्यासह गेली चार-पाच वर्षे दापोली – मंडणगड – खेड या मतदारसंघात फिरून आपला संपर्क वाढवित आहेत. या मतदारसंघामध्ये योगेश कदम यांना उमेदवारीची संधी मिळेल, असे चित्र आहे; मात्र या मतदारसंघामध्ये संजय कदम यांचाही जनसंपर्क चांगला आहे. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला मंडणगड – दापोली – खेड या तिन्ही ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे येथील निवडणूक चुरशीची होणार आहे. गुहागर मतदारसंघामध्ये उमेदवारीचे त्रांगडे होऊन बसले आहे. गत निवडणुकीमध्ये गुहागरची जागा भाजपला देण्यात आली होती; मात्र या ठिकाणी राष्ट्रवादीच्या भास्कर जाधव यांनी विजय मिळवला होता. आता ते शिवसेनेत प्रविष्ठ झाले असल्याने तेथे शिवसेनेने दावा केला आहे. भाजपकडून माजी आमदार डॉ. विनय नातू यांना तिकीट मिळू शकते. राष्ट्रवादीकडून अद्याप उमेदवाराबाबत घोषणा झालेली नाही. चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार सदानंद चव्हाण यांना पुन्हा संधी मिळेल का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. तिवरे धरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे तिकीट कापले जाऊ शकते, असा राजकीय होरा आहे. गुहागरला शिवसेनेला संधी न मिळाल्यास या मतदार संघातून भास्कर जाधव निवडणूक लढवू शकतात. राष्ट्रवादीकडून शेखर निकम यांना पुन्हा संधी मिळू शकते. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात म्हाडा अध्यक्ष आ. उदय सामंत हे शिवसेनेचे उमेदवार असतील. नुकत्याच शिवसेना भवन येथे झालेल्या उमेदवार मुलाखतीमध्ये उदय सामंत यांच्या व्यतिरिक्त कोणीही मुलाखत दिली नाही. त्यामुळे या मतदारसंघात उदय सामंत यांचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादीकडून सुदेश मयेकर इच्छुक आहेत. राजापूर – लांजा – साखरपा विधानसभा मतदारसंघात आमदार राजन साळवी यांनाही संधी मिळू शकते. हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडे हा विधानसभा मतदारसंघ गेल्यास अजित यशवंतराव हे पुन्हा आपले नशीब आजमावू शकतात. युती झाल्यास अशा प्रकारे राजकीय गणिते होऊ शकतात; मात्र भाजप-शिवसेना युती तुटल्यास सर्वच उमेदवारांना संघर्ष करावा लागेल, अशी स्थिती आहे. त्यातल्या त्यात रत्नागिरी, राजापूर – लांजा – साखरपा हे मतदारसंघ वगळता अन्य तीन मतदारसंघात जोरदार संघर्ष होईल, अशी राजकीय गणिते मांडली जात आहेत. 

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here