नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी 2 ऑक्टोबरला वर्धा येथील बापू सेवाधामपासून अपल्या नव्या लढाईला सुरुवात करणार आहेत. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त काँग्रेस कार्यकारी समितीसह राहुल गांधी वर्धा येथे येणार असून ते पदयात्रा काढणार आहेत. राहुल यांच्या कार्यक्रमानुसार, दुसर्या दिवशी म्हणजेच 3 ऑक्टोबरला ते विनोबा भावे यांच्या पवनार आश्रम ते वर्धापर्यंत पदयात्रा काढणार आहेत. त्यानंतर ते एका सभेला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाला महाराष्ट्र व मुंबईतील निवडक कार्यकर्त्यांनाच आमंत्रित केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानाला तोंड देण्यासाठी राहुल गांधी यांना 2 ऑक्टोबर रोजी सद्भावना आंदोलन सुरू करायचे आहे. रस्त्यांची अस्वच्छता साफ करण्यापूर्वी मनातील अस्वच्छता साफ करण्याचा संदेश देणे हे राहुलच्या सद्भावना आंदोलनाचे मूळ असणार आहे, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. तसेच, मॉब लिंचिंग आणि गोरक्षणाच्या नावाखाली होत असलेल्या हत्यांमुळे बिघडलेल्या सामाजिक वातावरणाची जाणीव राहुल गांधी या आंदोलनाच्यामाध्यमातून करतील असेही सांगण्यात आले आहे.
