पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गवर कशेडी घाटात धामणदेवी जवळ यंदाच्या पावसात दोनवेळा दरड कोसळली होती. आज मंगळवारी (दि.२५) सायंकाळी 6 च्या सुमारास कशेडी घाटात पुन्हा दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक काही तास विस्कळीत झाली होती. कशेडी वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दरड बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. घाट मार्गावर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने डोंगरावरची दरड पावसाच्या पाण्याबरोबर येत असल्याच्या घटना घडत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील धामणदेवी जवळ यंदाच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा दरड कोसळली आहे. रस्त्यावर मातीचा ढिगारा खाली आल्याने मार्गावरील एक बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. दरड खाली आल्याची माहिती मिळताच कशेडी वाहतूक पोलिसांनी घटना स्थळी दाखल होत जेसीबीच्या साहाय्याने दगड व माती बाजूला करत एक तासात महामार्ग सुरळीत केला. सहा. फौजदार मधुकर गमरे यांनी घटनास्थळी जेसीबी पाचारण करून एक तासात वाहतूक सुरळीत केली. पोलिसांच्या तत्परतेमुळे घाट मार्गावर वाहतुकीचा फार काळ खोळंबा झाला नाही.
