महामार्गाच्या चौपदरीकरण भूसंपादनासाठी आणखी ९०० कोटींची आवश्यकता

0

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी आवश्यक भूसंपादनासाठी आणखी ९०० कोटींची आवश्यकता आहे. वाढीव निधीसाठी पुरवणी मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. यामुळे भसंपादनाची रक्कम वाढून तब्बल साडेपाच हजार कोटींवर पोहचली आहे. महामार्गात बाधित होणाऱ्या मालमत्ता वाढल्याने भूसंपादनासाठी लागणारा आवश्यक निधी वाढल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. इंदापूर ते झाराप या मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. चौपदरीकरणासाठी सुरूवातीला मालमत्ताचे मुल्यांकन करण्यात आले. रस्त्याच्या मध्य भागापासून चौपदरीकरणाची हद्द निश्चित करण्यात आली. यात बाधित होणाऱ्या मालमत्तांचे मुल्यांकन करण्यात आले. मुल्यांकन प्रस्तावानंतर बाधितांना चौपट मोबदला देण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली होती. चौपदरीकरणाच्या भूसंपादनासाठी ४ हजार ४०० कोटी इतका निधी केंद्र शासनाकडून मंजूर करण्यात आला होता. यापैकी ३ हजार ८५० कोटी इतका निधी थेट खातेदारांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. परंतु, चौपदरीकरणाच्या भूसंपादनासाठी मंजूर आराखड्यात ९०० कोटींची वाढ झाली आहे. महामार्गात बाधित होणाऱ्या मालमत्तांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर असल्याने भूसंपादनासाठी आणखी ९०० कोटी निधीची आवश्यकता लागणार आहे. वाढलेल्या मालमत्तांमध्ये जागा, इमारतींची संख्या अधिक आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील भूसंपादनासाठी हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता भासणार आहे. भूसंपादनासाठी लागणाऱ्या अतिरिक्त निधीची मागणी राष्ट्रीय महामार्ग विभागाने पुरवणी मागणीद्वारे केंद्र शासनाकडे केली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने सादर केलेल्या पुरवणी आराखड्यावर केंद्र शासनाने सविस्तर अहवाल देण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग विभागाला केल्या आहेत, वाढीव मालमत्तांची माहिती केंद्र शासनाने मागवून घेतली आहे. यामुळे या बांधकामांची माहिती देण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सुरू आहे. वाढीव मालमत्तांचा सविस्तर अहवाल लवकरच केंद्र शासनाला सादर करण्यात येणार असून हा अहवाल केंद्राकडून मंजूर झाल्यानंतर भूसंपादनासाठी वाढीव निधी देण्याबाबत निर्णय होईल, दरम्यान ईदापूर ते झाराप या दरम्यानच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. चौपदरीकरणात सिंधुदुर्ग जिल्हा सर्वात आघाडीवर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौपदरीकरणाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. रत्नागिरीत २५ तर रायगड जिल्ह्यात २७ टक्के काम पूर्ण झाले आहे. चौपदरीकरणात रखडलेल्या चौदा पुलांची कामेदेखील आता प्रगतीपथावर आहेत. चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडून ही पुलांची कामे करून घेण्यात येत असून चौपदरीकरण आणि पुलांची कामे एकाचवेळी सुरू आहेत.LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here