रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातारणात पार पाडण्याचे निवडणूक आयोगासमोरचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी सी-व्हिजिल’ ह्या मोबाइल अॅप नागरिकांसाठी उपलब्ध केले आहे. निवडणुकीदरम्यान होणाऱ्या आदर्श आचारसंहिता उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या माध्यमातून थेट ऑनलाईन करू शकणार आहे. या तक्रारीवर अवघ्या १०० मिनिटांत कार्यवाही होणार आहे. निवडणूक जिंकण्यासाठी काही उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते गैरमार्गांचा अवलंब करीत असतात. मतदारांना पैसे वाटणे, मद्याच्या पाया देणे, आचारसंहितेचे उल्लंघन करून निषिद्ध क्षेत्रात प्रचाराचे बॅनर लावणे यांसारखे गैरप्रकार होत असतात. असे प्रकार रोखण्यासाठी जागरूक नागरिकांना निवडणूक आयोगाने नेमलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे लिखित तक्रार द्यावी लागते. त्यानंतर निवडणुकांचा निकाल लागला तरी त्याची चौकशी पूर्ण झालेली नसते. हे प्रकार टाळण्यासाठी आता निवडणूक आयोगाने ‘सी व्हिजिल’ अॅप लाँच केला आहे. या अॅपद्वारे निवडणूक काळात कुठेही गैरप्रकार घडत असेल किंवा आचारसंहितेचा भंग होत असेल तर जागरूक नागरिकांना रोखता येणार आहे. त्या घटनेचे छायाचित्र किंवा २ मिनिटांचे चित्रिकरण अॅपवर टाकल्यानंतर १०० मिनिटांच्या आत संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही देण्यात आली आहे. एखाद्यानागरिकानेआचारसंहितेचे उल्लंघन होतानाचे छायाचित्र किंवा चित्रिकरण अॅपमधून कळवल्यानंतर ती माहिती निवडणूक आयोगाकडे जाईल. निवडणूक आयोगाकडून ती माहिती संबंधित जिल्हा प्रशासनाच्या तक्रारी नियंत्रण कक्षात पाठवली जाईल. तिथून लगेच याची माहिती संबंधित भागातील किंवा मतदारसंघातील भरारी पथकाला मिळणार आहे. त्यानंतर १५ मिनिटांत भरारी पथक घटनास्थळी पोहोचेल. म्हणजे ३० मिनिटांत या तक्रारीची शहानिशा सुरू होईल. नंतर कारवाई करून संबंधित अहवाल आयोगाला सादर केला जाईल. म्हणजे तक्रार दाखल झाल्यापासून अवघ्या ५० मिनिटात संबंधित निवडणूक अधिकाऱ्याने आयोगाला अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. एकंदरीत १०० मिनिटांत त्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेल. नागरिकांना अॅन्ड्रॉईड मोबाईलवर गुगल प्ले स्टोअरवरून ‘सी व्हिजिल’ अॅप डाऊनलोड करावा लागेल. त्यानंतर संबंधिताला आपली माहिती नोंद केल्यानंतर हा अॅप मोबाईलवर अॅक्टिव्ह होईल. त्या व्यक्तीची माहिती गुप्त ठेवली जाईल.
