आयआयटी प्रकल्प रद्द, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

0
Goa Chief Minister Pramod Sawant address the media during a press conference ahead of IFFI 2019 inauguration in Goa on Tuesday. | DH Photo: Pushkar V

पणजी : सत्तरी तालुक्यातील मेळावली गावात आयआयटी नको अशा प्रकारची मागणी करत लोकांनी आंदोलन सुरू केल्यानंतर व त्या आंदोलनाने अलिकडेच हिंसक वळण घेतल्यानंतर सरकार अखेर नमले. आयआयटी प्रकल्प मेळावलीत रद्द केला जात आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. हा प्रकल्प अन्यत्र कुठे तरी नेला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांची ही घोषणा म्हणजे मेळावलीवासियांचा विजय असल्याचे राज्यभर मानले जात आहे.

मेळावली येथे १२ लाख चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत आयआयटी प्रकल्प उभा करण्यासाठी सरकारने भू-संपादनाचे सोपस्कार पार पाडले होते. एक चौदाच्या उताऱ्यावरही आयआयटीचे नाव आले होते. मात्र त्या जागेत स्थानिक लोकांच्या काजू व अन्य बागायतीही आहेत. जागा सरकारची असली तरी, आपण तिथे अनेक वर्षे उत्पन्न घेत आहोत, असे ग्रामस्थांचे म्हणणे होते व आहे. आरोग्य मंत्री विश्वजित राणे हे वाळपई मतदारसंघाचे आमदार असून मेळावली गाव त्यांच्याच मतदारसंघात येतो. तेथील गुळेली पंचायतीने सरकारला सहकार्य केले होते व मंत्री राणे यांना देखील आयआयटी हवी होती पण ग्रामस्थांनी आक्रमक रूप घेत अनेक दिवस आंदोलन सुरू ठेवल्यामुळे मंत्री राणे यांचाही नाईलाज झाला. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आयआयटी रद्द करा अशी मागणी केली होती. ती मागणी पूर्ण झाली. मुख्यमंत्री सावंत यांना आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी सत्तरीतील चारही झेडपी सदस्य, आजी-माजी सरपंच तसेच भाजपचे कार्यकर्ते भेटले. मंत्री विश्वजित तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, माजी आमदार नरहरी हळदणकर त्यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी गुळेलीच्या सरपंचासह झेडपी सदस्य सगुण वाडकर व इतरांचे म्हणणे ऐकून घेतले. लोकांना जर आयआयटी नको असेल तर आपण तो प्रकल्प रद्द करत असल्याचे जाहीर करतो, असे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले. एसीजीएल प्रकल्प होंडा येथे आल्यानंतर सत्तरी व डिचोली या दोन्ही तालुक्यांना त्याचा लाभ झाला होता. मेळावलीत आयआयटी प्रकल्प आल्यानंतरही लोकांना लाभ झाला असता, राज्याच्या विकासासाठीही तो खूप उपयुक्त ठरला असता पण काही लोकांची काहीजणांनी दिशाभुल केली व त्यामुळे आज आयआयटी प्रकल्प मेळावलीतून रद्द होत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:27 PM 15-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here