विनाशकारी रिफायनरीला कडाडून विरोधाची गरज

0

कणकवली : विनाशकारी रिफायनरीमुळे राजापूर तालुक्यातील नाणार, सागवे, कात्रादेवी, तारळ, चौके, उपळ तसेच देवगड तालुक्यातील गिर्ये, पुरळ या गावांबरोबरच संपूर्ण कोकण उध्वस्त होणार आहे. त्यामुळे या विनाशकारी प्रकल्पाला कोकणावासीयांनी कडाडून विरोध केला पाहिजे, असे आवाहन स्वतंत्र कोकण संघटनेचे अध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केले. स्वतंत्र कोकण संघटनेची सभा येथील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी प्रा. नाटेकर बोलत होते. जे. जे. दळवी, वाय. जी. राणे, दिलीप लाड, ए. आय. चिलवान, प्रा. सुभाष गोवेकर, प्रकाश धर्माधिकारी उपस्थित होते. प्रा. नाटेकर म्हणाले, देशातून सुमारे 600 मेट्रीक टन कच्चे खनिज तेल आयात करून त्याच्यावर नाणार येथे प्रक्रिया केली जाणार आहे. यातून पेट्रोल, डिझेल, विमानाचे इंधन तयार केले जाणार आहे. वार्षिक 6 कोटी टनाची जगातील सर्वात मोठी रिफायनरी असेल. हा प्रकल्प 14 गावांच्या जमिनीवर असल्याने सुमारे 3300 कुटुंबे विस्थापित होणार आहेत. या रिफायनरीसाठी औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यावर दररोज 18 हजार टन कोळसा घालून तेल शुध्दीकरण केले जाणार आहे. त्यामुळे 600 टन राख निर्माण होऊन ती वार्‍याबरोबर सर्वत्र पसरून पर्यावरणावर त्याचा विपरित परिणाम होणार असल्याचे प्रा. नाटेकर म्हणाले. प्रा. नाटेकर पुढे म्हणाले, उंच सखल असलेल्या संपादित 25 एकर जमिनीचे सपाटीकरण करताना सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरणार आहे. त्यामुळे राजापूर तालुक्यातील चौके, तारळ, पाळेकरवाडी इ. खोर्‍यातील गावे भराव टाकून गाडली जाणार आहेत. या प्रकल्पाला लागणारे गोडे पाणी समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून मिळवले जाणार असून त्यासाठी दरवर्षी समुद्राच्या 25 हजार कोटी लीटर पाण्यावर प्रक्रिया करून ते प्रदूषित गरम पाणी समुद्रात सोडले जाईल, त्यामुळे मासे व इतर सागरी सजीव मेल्याने मच्छीमार लोकांची उपासमार होणार आहे. कोकणातील काजू, आंबा बागायतीबरोबरच पर्यावरणावरही या प्रकल्पाचा विपरित परिणाम असून रिफायनरीला प्रकल्पाला कडाडून विरोध केला पाहिजे, असे मत प्रा. नाटेकर यांनी व्यक्‍त केले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here