इंचियान : भारताची बॅडमिंटनपटू पी वी सिंधूला बुधवारी कोरिया ओपन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. अमेरिकेच्या झांग बेईव्हेन हिने 7-21, 24-22, 21-15 अशी मात करत सिंधूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. हा सामना 56 मिनिटे चालला. पहिला गेम 21-7 असा सहज जिंकून सिंधूने जोरदार सुरुवात केली पण, पुढच्या दोन गेममध्ये तिला आपल्या खेळातील लय कायम राखता आली नाही. या दोन्ही गेममध्ये बेईव्हेनने चपळाईने खेळ करून वर्ल्ड चॅम्पियन सिंधूला पराभवाची चव चाखण्यास भाग पाडले. आता भारतीयांच्या नजरा सायना नेहवालवर असून ती आज स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहे. पुरुष गटातही भारताला पराभवाचा धक्का बसला आहे. बी साई प्रणीत पहिल्या फेरीतून बाहेर पडला आहे. डेन्मार्कच्या आंद्रेस ॲन्टोन्सन विरुद्ध खेळताना साई प्रणीत जखमी झाला आणि त्याला दुखापतीच्या कारणास्तव दुस-या गेमदरम्यान सामना अर्धवट सोडावा लागला. साई प्रणीतने पहिला गेम 9-21 असा गमावला होता. दूस-या गेममध्येही तो 7-11 असा पिछाडीवर होता. 27 वर्षीय बी साई प्रणीतची अलीकडील कामगिरी खूप चांगली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या चायना ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत त्याने मजल मारली होती. अखेरच्या 8 मध्ये त्याने प्रवेश केला होता. मात्र, त्याला इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुकाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. चायना ओपन स्पर्धेपूर्वी त्याने बासेल येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. साई प्रणीत वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या पुरुष एकेरी गटात 36 वर्षानंतर पदक जिंकणारा भारतीय बॅडमिंटनपटू ठरला होता. 1983 मध्ये भारताचे माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोणने यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
