सुरत : भारतीय महिला क्रिकेट संघाची फिरकी गोलंदाज दिप्ती शर्माने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळताना शानदार प्रदर्शन करत नव्या विक्रमाला गवसणी घातली. दिप्तीने उभय देशांदरम्यान मंगळवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात चार षटकांतील तीन षटके मेडन टाकल्या. एका टी-20 सामन्यात तीन षटके मेडन टाकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरल. दिप्तीने चार षटकांमध्ये 8 धावा देवून दक्षिण अफ्रिकेच्या तीन खेळाडूंना बाद केले. दिप्तीच्या फिरकी गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण अफ्रिका संघावर 11 धावांनी मात करण्यात भारताला यश आले. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने दक्षिण अफ्रिकेसमोर 130 धावांचे लक्ष्य ठेवले. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने 43 धावांची खेळी केली. मात्र, भारताचे 8 खेळाडू बाद झाले. उत्तरादाखल मैदानात उतरलेल्या दक्षिण अफ्रीका संघाचा भारतीय गोलंदाजांसमोर टिकाव लागला नाही. मिगनोन डू प्रीजने अर्धशतकी खेळी करून विजयासाठी संघर्ष केला. मात्र, विजय मिळवता आला नाही. भारताच्या दिप्ती शर्माने तीन तर, शिखा पांडे, पूनम यादव आणि राधा यादव यांनी दोन-दोन व हरमनप्रीतने एक गडी बाद करून भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला. शेफालीने रचला इतिहास… या सामन्यात दिप्ती शर्मासह शेफाली वर्मा ही खेळाडूही आकर्षणाचा विषय ठरली. शेफाली सर्वात कमी वयात (पुरुष व महिला दोन्ही गटात) आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळणारी पहिली क्रिकेटपटू ठरली. सामन्यावेळी शेफालीचे वय 15 वर्ष 239 दिवस होते. इतक्या कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रदार्पण करून शेफालीने इतिहास रचला आहे. तिने मास्टर ब्लास्टर सचिन टेंडूलकरचा विक्रम मोडला आहे. सामना सुरू होण्याआधी जेव्हा शेफाली वर्माला टीम इंडीयाची कॅप प्रदान करण्यात आली तेव्हा संघातील सर्व भारतीय खेळाडूंचा जोश व उत्साह पाहण्यासारखा होता.
