‘नितीन गडकरींनी मुंबई-गोवा महामार्गावरील धोकादायक वळणांकडे लक्ष द्यावे’

0

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असले तरीही अनेक ठिकाणी अपघाताचा धोका राहणार आहे. सध्या पूर्ण झालेल्या खेड, राजापूर येथील भागात ही परिस्थिती दिसून आली असून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीच आता याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा कोकण हायवे समन्वय समितीचे संजय यादवराब यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा अभ्यास करण्यासाठी कोकण हायवे समन्वय समितीने नुकताच महामार्गाचा अभ्यास दौरा केला. पथकाकडून केलेल्या दौऱ्यातील महत्त्वाच्या बाबी श्री. यादवराव यांनी सांगितल्या. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग वेगाने पूर्ण करण्यासाठी पावले उचलली जात आहेत; मात्र कोकणातील महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी खूप बेळ लागत आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. मुंबई-गोवा महामार्गावर अनेक धोकादायक वळणे आहेत. त्या ठिकाणी हमखास अपघात होतात. नवीन महामार्ग बनवताना त्यातील जवळपास सर्व वळणे काढणे रस्ता शक्य तितका सरळ करणे आवश्यक होते; परंतु महामार्गाचा आराखडा बनवत असताना फार मेहनत न घेता त्यातील अनेक वळणे जशीच्या तशी ठेवली आहेत. दोन्ही बाजूंनी रस्ता रुंद केला. त्यामुळे प्रचंड वेगाने येणाऱ्या गाड्यांना ९० अंशात वळण घ्यावे लागेल. त्यावेळी प्रचंड मोठे अपघात होतील. खेड तालुक्यातील येथील भोस्ते घाट आणि राजापूर तालुक्यातील नेरके घाट ही त्यातील दोन ठळक उदाहरणे आहेत. तीव्र उतार आणि वळणामुळे महामार्गावरून नव्याने येणाऱ्या वाहनचालकाला वेग आवरणे कठीण होणार असून अपघातांची शक्यता आहे. कोकण हायवे समन्वय समितीच्या अभ्यास दौऱ्यात ही बाब प्रकर्षाने जाणवली. याच ठिकाणी वाहन ताशी २०-२५ किलोमीटर एवढा कमी वेग ठेवूनसुद्धा किमी सहजी वळवता येत नाही. हीच परिस्थिती अनेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात दिसते. महामार्गावर प्रत्येक चाळीस किमीच्या अंतरावर दोन अशी वळणे आढळतील. काही ठेकेदारांनी काम घाईघाईने पूर्ण करण्याच्या नादात वळणांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. महामार्गाच्या बाजूला असलेल्या नद्यांमधील गाळ काढून तो महामार्गाच्या भरावासाठी वापरावा, अशा सूचना केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या होत्या. त्यामुळे नद्या खोल होतील आणि भरावासाठी अनावश्यक डोंगर फोडावे लागणार नाहीत. पर्यावरणाचे नुकसानही कमी होईल. मात्र काही ठिकाणी तसे आढळून आलेले नाही. ठेकेदारांनी नद्यांमधील गाळ वापरलाच नाही. उलट डोंगर फोडून माती घेतली. काही ‘ठिकाणी महामार्गावरील माती नदीत टाकून देण्यात आली आहे. राजापूरजवळच्या नदीत असा प्रकार घडला आहे. त्यामुळे पावसाळ्यात परिसरातील भातशेतीमध्ये पुराचे पाणी शिरून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते, याकडेही श्री. यादवराव यांनी लक्ष वेधले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:32 PM 16-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here