नवी दिल्ली : ऑलिंपिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवलेला प्रसिध्द कुस्तीगीर योगेश्वर दत्त लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. पुढील महिन्यात हरियाणात होणार्या विधानसभा निवडणुकीवेळी योगेश्वर दत्त याला पक्षाकडून तिकीटही दिले जाण्याची शक्यता आहे. 2012 मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत दत्त याने कांस्यपदक प्राप्त केले होते. योगेश्वर दत्त हा मूळचा हरियाणाचा रहिवासी आहे. त्याने हरियाणा पोलिस दलातील सेवेचा राजीनामा दिला असल्याची माहिती दत्त याने प्रदेश भाजपचे अध्यक्ष सुभाष भराला यांना दिली. लवकरच त्याचा भाजप प्रवेश होणार असल्याचे समजते. 2014 सालच्या कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये सुवर्णपदक प्राप्त केलेल्या योगेश्वरचा 2013 साली पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. सोनिपत जिल्ह्यातून योगेश्वरला विधानसभेचे तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे.
